You are currently viewing २६ मे पासून कोलगाव येथिल श्री देवी सातेरीचा त्रैवार्षिक पडली उत्सव

२६ मे पासून कोलगाव येथिल श्री देवी सातेरीचा त्रैवार्षिक पडली उत्सव

पाच दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन..

 

सावंतवाडी :

कोलगावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी पंचायतन देवस्थानचा वार्षिक पडली उत्सव गुरुवारी २६ मे ते ३० मे दरम्यान होत आहे. यानिमित्त पाच दिवसात विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी सायंकाळी ४ वाजता कुळघराकडून (चंदन धुरी) तरंग काठीसह सवाद्य श्री देवी सातेरी मंदिर येथे प्रस्थान व मुक्काम, शुक्रवारी दुपारी २ वाजता सातेरी मंदिराकडून तरंग काठीसह चव्हाटा येथून श्री दिर्बादेवीच्या भेटीसाठी प्रस्थान आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर धार्मिक विधी, मानपान, नवस फेड आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ९ वाजता महाप्रसाद, त्यानंतर दिर्बा देवी मंदिराकडून तरंग काठीसह चव्हाटा येथे प्रस्थान व मुक्काम होणार आहे.

शनिवारी सकाळी १० वाजता पडली भरण्याचा पारंपरिक कार्यक्रम, त्यानंतर भाविकांच्या पडलीमध्ये ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४ वाजता देवतांना आवाहन केल्यानंतर भावकांची गाऱ्हाणी व नवस बोलण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ८ वाजता सुधाकर दळवी प्रस्तुत चेंदवणकर दशवतार मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. रविवारी सकाळी १० वाजता देवतांना आवाहन केल्यानंतर भाविकांची गाऱ्हाणी व नवस बोलण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम रात्री ८ वाजता श्री वाळकेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांचे नाटक होणार आहे.

सोमवार सकाळपासून भाविकांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम, सकाळी १० वाजता देवतांना आवाहन केल्यानंतर भाविकांना आशीर्वाद कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर कोलगाव येथील दादा सावंत (पुणे) यांचे सौजन्याने महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २.३० वाजता देवतांना आवाहन केल्यानंतर देवतांसह पडली महादेवाचे केरवडे येथे प्रस्थान होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मानकरी, स्थानिक देवस्थान कमिटी आणि कोलगाव ग्रामस्थांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा