You are currently viewing वेगळं व्हायचयं मला …

वेगळं व्हायचयं मला …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

*वेगळं व्हायचयं मला …*
(हे आवश्यक आहे का …)

हे अजिबात आवश्यक नाही , हे मी अगदी ठासून सांगू
शकते … कारण एका नाण्याच्या दोन बाजू असतातच…
पूर्वापार चालत आलेली आपली एकत्र कुटुंब पद्धती महान
आहेच … यात जरा ही शंका नाही …नवीन बदलत्या काळा
नुसार आपण आवश्यक ते फेरफार केले की झाले ..
तेवढे तारतम्य पाळणे मात्र अत्यंत गरजेचे आहे …

 

आमच्या लहानपणी,सुमारे पन्नास साठ वर्षांपूर्वी सर्वत्र
एकत्र कुटुंब पद्धती होती.मी सातवित असतांना आमच्या
वर्गातील एक विद्यार्थी घाईघाईत शाळेत येतांना दूध न
पिऊन आल्यामुळे त्याचे काका दुधाचा तांब्या घेऊन आमच्या
वर्गात आले व तो सर्वांसमक्ष वर्गात दूध प्यायल्याचे आता ही
मला डोळ्यांसमोर दिसते आहे.मोठ्या कुटुंबात टाईमटेबल
चुकून अशा गडबडी होत असत , काका चहा सुद्धा वर्गात
घेऊन येत असत.पोटच्या पोरा प्रमाणे घरातील सर्वांची काळजी वडीलधारी मंडळी घेत असत. कामांची वाटणी ही
झालेली असे.व तसे सर्वजण आपापली कामे बिनचूक करत
असत. एवढेच काय पुनर्विवाहाची (एक बायको असतांना)
परवानगी नसली तरी दोन्ही बायका व त्यांची मुले गुण्या
गोविंदाने रहात असत.

 

भावा भावांमध्येही आज्ञापालन असे, आदर असे, घरातील
मोठा भाऊच सारे निर्णय घेत असे. काका चुलते चुलतभाऊ
ओळखू येऊ नये इतक्या एकोप्याने रहात असत . मुले तर
चुलत घरी ही जेऊन येत असत, कुठे ही खेळत व झोपत
असत …एकत्र कुटुंबामुळे खर्च कमी होऊन शेती वाडीचा
विस्तार होत असे.इस्टेट वाढत असे. मुले शहरात शिक्षणाला
पाठवली जात, त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जाई…

 

असं इतकं सगळं चांगलं चाललेलं असतांना ह्या एकत्र कुटुंब
पद्धतीला कशी काय दृष्ट लागली माहित नाही. शिक्षणासाठी
बाहेर पडल्यामुळे झाले का हे ? परगावी गेले, तिथेच शिकले,
नोकरीला लागले व तिथेच सेटल झाले. गावाकडे असलेली
भावंडे आईवडील एकाकी पडले. नाईलाजाने त्यांनी ही व्यवस्था स्वीकारली व हळू हळू हे लोण पसरत जाऊन शहरीकरण वाढले, खेडी ओस पडून शहरातली गर्दी व सुविधा
वाढल्या. शहरातले झगमगाटीचे जीवन मोह घालू लागले व
कुटुंबापासून अलग राहण्याचा कल वाढत जाऊन कुटुंबांची
विभागणी झाली.शहरातल्या कुटुंबाकडे खेड्यातली मुले
शिकायला जाऊन शहरीकरणाचे संस्कार वाढले व हळूहळू
कुटूंबे लहान होऊ लागली.

 

लहान कुटुंबात नकळत स्वातंत्र्य जास्त मिळू लागले, व मग
पुढे त्याची चटकच लागली ..
आता तर कहरच झाला आहे… लग्न ठरवतांना मुलाला आई वडील नसतील तर बरे… एकटा मुलगा असेल तर किती छान..
इथपर्यंत मजल गेली आहे. ज्या आईबापांनी जन्म दिला, तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवले, वाटेल तेवढ्या खस्ता काढल्या ते ही आता नकोसे झालेत …
“ तरी बरं सर्वांना एकाच रस्त्याने जायचे आहे…”
अहो, काही जात्यात … काही सुपात .. इतकाच फरक आहे.
लग्न झाल्या झाल्या वेगळं व्हायचं मला… ची स्वप्ने पडू लागतात.

 

शहरात दोघे कामावर जात असतील तर … मुलांना किती
अडचणींना सामोरे जावे लागते..? मुले पाळणा घरात ठेवावी
लागतात व मुलांची प्रचंड आबाळ व गैरसोय तर होतेच.शिवाय
आजी आजोबांपासून दूर राहिल्यामुळे संस्कारांची वानवा होते
ती वेगळीच ! ना आजी आजोबांचे प्रेम मिळते ना लाड कोड ..
अहो,केवढे प्रेम असते आजी आजोबांचे नातवंडांवर … अगदी
जीव की प्राण असतात त्यांचे… दोघे ही वंचित होतात त्या
प्रेमाला ….

 

हं , थोडे फार मतभेद घरोघर असतात .. त्या साठी वेगळे रहाणे हा एकमेव उपाय आहे काय ? दुसरे काही मार्गच
नाहीत काय ? आहेत .. एकाच घरात खाली … वर असे मजल्यावर किंवा शेजारी शेजारी फ्लॅट मध्ये राहिल्यास
आजी आजोबांचे नातवंडांकडे लक्ष ही राहते नि प्रेम ही
मिळेल ..आणि जन्मदाते आई वडील मुलांपासून कसे दूर
राहू शकतील हो.. झुरून झुरून रडून रडून मरतात ते! मूक
पणे रडतात, अश्रू लपवतात .. दु:ख्ख दिसू देत नाहीत ..
दोन्ही कडून त्यांची कोंडी होते हे मुलगा म्हातारा झाल्यावरच
त्याला कळते .

 

मंडळी , पोटच्या गोळ्यापासून लांब राहण्या इतके मोठे दु:ख्ख
जगात नाही… हे लांब जाणारी पिढी का समजून घेत नाही?
म्हणे, वेगळं व्हायचंय मला ?

कालाय तस्मै नम: ….

आणि हो … ही मते फक्त माझी आहेत बरे ….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १६ फेब्रुवारी २०२२
वेळ : रात्री ८ :१३

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − fourteen =