You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुगाराच्या बैठका बंद झाल्यावर सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर गोवा हद्दीत सुरू झाल्या बैठका

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुगाराच्या बैठका बंद झाल्यावर सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर गोवा हद्दीत सुरू झाल्या बैठका

*पेडणे पोलिसांच्या आशीर्वादाने गोवा हद्दीत जुगाराचे फड*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुगाराच्या अड्ड्यांवर होणाऱ्या पोलिसांच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील जुगाराच्या तक्षीमदारांनी जिल्ह्यातील बैठका बंद करून आपला मोर्चा जुगारासाठी सुरक्षित वाटणाऱ्या सिंधुदुर्ग गोवा राज्याच्या सीमेवरील गोवा हद्दीत हलवला. पेडणे पोलिसांच्या आशीर्वादाने सिंधुदुर्ग गोवा सीमेवरील गोवा हद्दीत सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर लाखोंची उलाढाल होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तरुण गोवा राज्यात नोकरीच्या निमित्ताने दररोज ये जा करतात. परंतु नोकरीच्या निमित्ताने गोव्यात जाणाऱ्या तरुणाईतील काही तरुण गोवा हद्दीत सुरू असणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यांवर दिवस रात्र खेळतात आणि स्वतःला फसवतातच, पण आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपल्या कुटुंबाला फसवून आपले भविष्य अंधारमय करतात. गोवा हद्दीत सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवरून धक्कादायक माहिती पुढे येत आहे ती म्हणजे *गांजा पुरवठा..* तरुणाई गांजाच्या व्यवसायात बक्कळ पैसा मिळविण्यासाठी स्वतःला गुरफटून घेते आणि बरबाद होते. गोवा हद्दीतील जुगाराच्या बैठका आणि गांजा पुरवठा यामुळे गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस म्हणजे संशोधनाचा विषय बनला आहे. एकीकडे जिल्ह्यातील आणि गोव्यातील लोकांकडून अनैतिक धंदे केले जातात, जुगाराच्या आडून गांजा विक्री केला जातो परंतु लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत पोलिसांकडून मात्र पर्यटकांच्या गाड्या रोखून तपासणी करत पर्यटकांना नाहक त्रास दिला जात आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मूळचे सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावातील आहेत. अलीकडेच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने दौरा केला होता. त्यामुळे जिल्ह्याविषयी त्यांच्या मनात प्रेम असणे देखील साहजिकच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तरुण व्यवसाय निमित्त गोव्यात जातात, बरेचजण राहतात. परंतु सिंधुदुर्ग गोवा हद्दी वरील गोवा हद्दीत सुरू असणाऱ्या जुगार आणि गांजा विक्रीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तरुण अवैद्य व्यवसायात गुंतत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांची योग्य ती दखल घेऊन जिल्ह्यातील युवा पिढी त्यात अडकून बरबाद होऊ नये यासाठी गोवा सीमेवरील सुरू असलेले जुगार बंद करावेत अशी मागणी जागृत नागरिकांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा