You are currently viewing वझरेत चिरेखाणीत बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू….

वझरेत चिरेखाणीत बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू….

दोडामार्ग :

तालुक्यातील वझरे येथे चिरेखाणीत 8 व 10 वर्ष वयाच्या दोन चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून आपल्या आईसोबत कपडे धुण्यासाठी गेले असता ही घटना घडली
दोडामार्गात यामुळे खळबळ उडाली असून महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे सदर घटना घडल्याचा आरोप केला जात आहे,परवाना संपलेल्या खोदकाम केलेल्या खाणी तशाच उघड्या आहेत यात पाणी साचते याच पाण्यात धोंडीराम भगवान जंगले व नागेश विठ्ठल जंगले हे दोन चिमुरडे पडल्याने त्यांचा अंत झाला. ही घटना आज सकाळी घडली असून खूप शोधाशोध करून ते सापडले नाहीत यावेळी एकाचा मृतदेह या खाणीत दिसल्याने ही घटना उघडकीस आले. त्यांचे मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढून ते उत्तरीय तपासणी साठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले याबाबत दोडामार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकाराला पूर्णतः महसूल विभाग जबाबदार असून तत्कालीन तहसीलदार, मंडळ अधिकारी तलाठी यावर कारवाई करण्याची मागणी दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख व प स सदस्य बाबुराव धुरी यांनी केली आहे. त्यांनी याठिकाणी जात प्रत्यक्ष पाहणी केली व कुटुंबियांना धीर दिला. या जुन्या परवाना संपलेल्या खाणी जोपर्यंत बुजवल्या जात नाहीत तोपर्यंत नवीन खाणींचे नूतनीकरण व परवाना देऊ नये तसेच ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या खाण मालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
प स सदस्य लक्ष्मण उर्फ बाळा नाईक यांनीही ही घटना दुर्भाग्य पूर्ण असल्याचे सांगत याला महसूल विभाग पूर्णपणे जबाबदार आहे. त्यांच्या या दुर्लक्षामुळे अशी घटना घडली असून जे कोणी या घटनेत दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी दोडामार्ग भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा