You are currently viewing शिवसेना नेते संदेश पारकर यांची कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्षपदी नियुक्ती

शिवसेना नेते संदेश पारकर यांची कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्षपदी नियुक्ती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकण पर्यटन विकासासाठी संदेश पारकर यांना दिली मोठी जबाबदारी

 

कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी शिवसेना नेते संदेश पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री पारकर यांनी यापूर्वी कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारशीने तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीवर संदेश पारकर यांची नियुक्ती झाल्याने कोकणातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी श्री. पारकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कोकण विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभागीय वन अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे उपसंचालक हे या समितीचे सदस्य असणार आहेत. तर पर्यटन संचानालयाचे विभागीय उपसंचालक या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. या समितीचे मुख्य कार्यालय कोकण भवन नवी मुंबई येथे असणार आहे. या पदाला राज्यमंत्री दर्जा प्राप्त आहे.

कोकणातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामधल्या पर्यटन विकासाच्या धोरणावर ही समिती काम करणार आहे.

दरम्यान या नियुक्तीनंतर शिवसेना युवा नेते संदेश पारकर म्हणाले की, कोकणात समुद्री पर्यटनाबरोबरच ऐतिहासिक पर्यटन, धार्मिक पर्यटन स्थळे यांचा व्यापक प्रमाणात समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या अनेक गडकिल्ल्यांचा इतिहास कोकणला लाभलेला आहे. रायगड किल्ला व सिंधुदुर्ग किल्ला या किल्ल्यांनी कोकणचा इतिहास आजही जपलेला आहे. या किल्ल्यांच्या विकासाबरोबरच कोकणातील पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती पारकर यांनी यावेळी दिली. यापुढील काळात पर्यटन हाच रोजगाराचा केंद्रबिंदू मानून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण धडाडीने काम करू असेही पारकर यांनी सांगितले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी अत्यंत धोरणात्मक विचार करून या समितीची स्थापना केलेली आहे. त्यामुळे कोकणच्या पर्यटनाला यापुढच्या काळात खऱ्या अर्थाने चालना मिळेल आणि आपणही पर्यटन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही संदेश पारकर म्हणाले.

या नियुक्तीनंतर संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे आभार मानले. तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी सह कोकणातील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे देखील आभार श्री.पारकर यांनी मानले आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल पारकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा