You are currently viewing रस्त्यांच्या साईडपट्या पावसाळ्यापूर्वी सुधारा अन्यथा अधिकाऱ्यांना काळं फासणार…

रस्त्यांच्या साईडपट्या पावसाळ्यापूर्वी सुधारा अन्यथा अधिकाऱ्यांना काळं फासणार…

मनसेचा सार्वजनिक बांधकाम विभागाला सज्जड दम

 

कुडाळ :

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत कुडाळ तालुक्यातील रस्त्यांची कामे सदोष पद्धतीने केल्याने ती किती काळं टिकणार,रस्त्यांच्या साईडपट्या कधी दुरुस्त करणार,रस्त्यांची गटारे व ड्रेनेज यंत्रणा साफ सफाई कधी करणार,सदोष पद्धतीने काम करणाऱ्या कंत्रातदारांवर कारवाई कधी करणार अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत मनसे कुडाळ शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा धारेवर धरले.एएमसी असलेल्या रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ थातूर मातूर मलमपट्टी करून बिल काढण्यासाठी केली जात आहेत,मोबाईल कंपन्यांनी केबल जोडणी करत असताना साईडपट्टी दुरुस्तीसाठी दिलेला निधी गिळंकृत केला असा आरोप मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केला.

कुडाळ तालुक्यातील कुडाळ – पाट , वेताळ बांबर्डे – गोठोस , घावनळे – आंबडपाल , कुडाळ – वेंगुर्ले या मार्गांची कामे पूर्णतः निकृष्ट दर्जाची असून याबाबत अनेकदा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ कारवाईची आश्वासने देत चालढकलपणा करीत आहे. या विभागातील वरिष्ठ अभियंता आणि कंत्राटदार यांनी संगनमताने आर्थिक घोळ केल्याचा खळबळजनक आरोप करत मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरले.अपघात होऊन माणसं जखमी होत आहेत तरी अधिकारी सुस्त कसे? रस्त्याच्या साईडपट्टीची कामे पावसाळ्यापूर्वी झाली पाहिजेत ती कधी होणार ? निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई का नाही ? आदी प्रश्नांचा भडीमार करीत मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला . उप अभियंता श्री चव्हाण यांनी 20 मे पूर्वी साइडपट्टी दुरुस्ती होतील,अर्थवट राहिलेली कामे पूर्ण केली जातील, 22 तारीख नंतर मनसे पडाधिकारी व बांधकाम अधिकारी रस्त्यांची संयुक्त पाहणी करतील अशी आश्वासने दिली मात्र, यावेळी मनसेने बांधकाम विभागाला शेवटचा आणि निर्वाणीचा इशारा देत रस्त्यांची अवस्था सुधारा अन्यथा कार्यालयात येऊन काळे फासणार असा सज्जड दम दिला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे ,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,विभाग अध्यक्ष सुंदर गावडे,रामा सावंत,कुडाळ शहर सचिव रमाकांत नाईक आदी पदाधिकारी तर उप अभियंता श्री चव्हाण, शाखा अभियंता श्री पाटील व बिऱ्हाडे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा