You are currently viewing वेगळं व्हायचंय मला

वेगळं व्हायचंय मला

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.अमृता केळकर यांचा अप्रतिम लेख

आयुष्य म्हणजे काय तर कारण आणि परिणामांचं शास्त्र. अवसानघात, अनपेक्षित धक्का या गोष्टी दुःख निर्माण करतात. तसंच सतत घडणारे बदल आणि प्रगती यात आनंद असतो. असे अनेक लहानसहान आनंद मिळत गेले की माणूस त्यालाच सुख समजू लागतो. एकदा जीवनाला एकसुरीपणा आला की जगणं डाचु लागतं, स्वतःला आणि इतरांना सुद्धा…
“वेगळं व्हायचंय मला” असे उद्गार काढणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मी कधीच चूक म्हणणार नाही. चुकते ती वेळ, कारणीभूत असते ती त्यावेळची परिस्थिती…
वेगळं व्हायचा विचार सोपा वाटतो… तो विचार निर्णयात बदलल्यावर निभावणं कठीण होऊन बसतं. कधी तो विचार घरात न सांगता परस्पर विवाह करण्याऱ्यांचा असतो. ते लग्न फार काळ टिकलं नाही तर एकमेकांना दोष दिला जातो त्यातून दोघे विभक्त होतात… कधी सासू सुनेचं न पटणारं किंवा तडजोडीचं नातं असतं. सासू सुद्धा वेगळं होण्याचा विचार मांडूच शकते! कधी मुलाला सुद्धा आईच्या-वडिलांच्या सहवासात फार काळ रहायचं नसतं मग ते मनाविरुद्ध किंवा मुद्दाम केलेली कृती असू शकते. जावा-जावा एका कुटुंबात राहणं तर अगदी दुर्मिळ झालं आहे…अनेकांना वेगळं राहून नाती जपायची असतात… अनेकांना वेगळं होऊन विषारी नाती तोडायची देखील असतात… कुणावरही टीका करणं टाळलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे.
समाजाला नुसती टीका नकोय… त्यांना त्यावरचे उपाय हवेत फक्त तेव्हड्यासाठी हा लेखनप्रपंच…
विवाह करताना आर्थिक, धार्मिक, सामाजिक, शरीरस्वास्थ्यातील, भावनिक आणि व्यावहारिक गुंतवणूक किती आणि कोणत्या प्रकारची आहे याचं पूर्ण ज्ञान उभयतांना असायलाच हवं. म्हणजे पुढचे अनर्थ टळतात.
वेगळं व्हायचा विचार मनात येईल तेंव्हाच तसं झाल्यावर काय होईल याचा अंदाज बांधता यायला हवा. काही तोटे सहन करून भविष्यात होणारे फायदे कोणत्या स्थितीत जास्त आहेत हे पहायला हवं. सुनांनी एकच विचार करावा, पाळणाघर चालवणाऱ्या मावशीपेक्षा माझी सासू नक्कीच माझी मुलं जास्त चांगल्याप्रकारे सांभाळेल… मुळात लग्न का करायचं तर समाजाला सुसंस्कृत आणि सुसंस्कारी पिढी द्यायची आहे हे मुख्य ध्येय्य हवं.
कुटुंबासाठी सासू खूप झटलेली असते. तिलाही वेगळं व्हावं वाटूच शकतं. वेगळं राहून शांततेत वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचा तिला किंवा कोणत्याही पात्र व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे. भेटीगाठी ठेवून सुद्धा त्या व्यक्तीच्या संपर्कात राहता येतं. मनं जपली जातात आणि आपोआप पुढच्या पिढीवर चारही आश्रमांचे संस्कार घडतात.
मुलगा उच्च शिक्षण घेऊन भरपूर मिळकत असणारी नोकरी किंवा व्यवसाय करतो. अशावेळी त्याला साजेशा जीवनपद्धतीत राहू लागतो. आई वडील त्या मानाने साध्या जीवनशैलीत नांदत असतात. आईवडिलांना त्यांचं अनेक वर्षांचं गुंफलेलं वर्तुळ प्रिय असतं आणि मुलाला त्याचं नवीन विणलेलं सोन्याचं घरटं! कुटुंब वेगळं होणं साहजिक असतं इथे! व्हावं वेगळं… पण कोणीही कोणत्याही नात्याच्या प्रेमासाठी झुरु नये याची काळजी घ्यावी फक्त. अदृश्य नाळ जोडलेलीच हवी.
एकाच घरात अनेक सुना फार कमी नांदतात असा सरासरी अनुभव अनेकांना आहे… जावा-जावा आपसांत खूप चांगल्या मैत्रिणी देखील होऊ शकतात. एकमेकांना वेळोवेळी आर्थिक, भावनिक तसेच व्यावहारिक आधार सुद्धा देऊ शकतात हा विचार हवा. कदाचित त्यांची दुःख सारखी असू शकतात. अनेक ठिकाणी अशी कुटुंब वेगळी होऊन देखील सणासुदीला एकत्र येतात. मरण असो नाहीतर तोरण, प्रत्येक प्रसंगात एकमेकांना साथ करतात. संस्कृती जपतात. असं वेगळं होणं असेल तर ते सोन्याहून पिवळं नाही का?
कौटुंबिक अडचणी निर्माण होण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे न बोलणं! काहीही विचार मनात आले तर संबंधित व्यक्तीसोबत बोला. व्यक्त व्हा. राग आला तरी सौम्य शब्दांत व्यक्त व्हा. आणि स्वतःची चूक उमगली तरी बोलून दाखवा. क्षमा मागणं कमीपणाचं कधीच नसतं तसंच क्षमा करणं देखील! आधी स्वतःवर प्रेम करा, कारण स्वतःवर प्रेम करणारा माणूसच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. प्रेम म्हणजे माया नव्हे तो एक दुवा असतो परमेश्वर आणि जीवातला… आपल्यातल्या चैतन्याची हाक ऐका…
“वेगळं व्हायचं नाहीये मला!”

✍️सौ.अमृता मनोज केळकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 10 =