You are currently viewing देवबागच्या संरक्षणासाठी आवश्यक बंधाऱ्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लागेल… निलेश राणे

देवबागच्या संरक्षणासाठी आवश्यक बंधाऱ्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लागेल… निलेश राणे

देवबाग गावातील धोकादायक वाड्यांची केली पाहणी…

मालवण

देवबाग गावाचे पावसाळ्यात होणार्‍या समुद्री अतिक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी अत्यावश्यक ठिकाणी बंधारा घालण्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावले जाईल असे माजी खासदार, भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी देवबाग येथे स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी मालवण दौर्‍यावर आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे देवबाग ग्रामस्थांनी पावसाळ्यात होणार्‍या समुद्री अतिक्रमणामुळे देवबाग गावास धोका निर्माण होणार असल्याने बंधार्‍याचे काम मार्गी लावावे अशी आग्रही मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर श्री. राणे यांनी आपल्या फंडातून अत्यावश्यक ठिकाणी तत्काळ बंधार्‍याचे काम करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही दिली होती. या अनुषंगाने आज मालवण दौर्‍यावर आलेल्या माजी खासदार नीलेश राणे यांनी आज दुपारी देवबाग गावास भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, आबा हडकर, आनंद शिरवलकर, मोहन कुबल, हालेस डिसोझा, भाई मांजरेकर, दाजी सावजी, रवींद्र टेंबुलकर यांच्यासह देवबाग ग्रामस्थ व पतन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. राणे यांनी देवबाग केळुसकरवाडी, विठ्ठल मंदिर, मधलीवाडी, डिंगेवाडी, सांताक्रूझवाडी, मोंडकरवाडी येथे ग्रामस्थांसमवेत भेट देत पाहणी केली. यावेळी श्री. राणे यांनी पावसाळ्यात ज्याठिकाणी सागरी अतिक्रमणाचा धोका वस्तीस पोहचतो तो टाळून ग्रामस्थांना संरक्षण देण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी बंधारा बांधण्याचे काम तत्काळ हाती घेण्यात यावे अशा सूचना त्यांनी पतन विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या. याठिकाणी टेट्रापॉडचा बंधारा बांधणे शक्य आहे का? यादृष्टीनेही प्रयत्न करावेत असेही श्री. राणे यांनी स्पष्ट केले.

पाहणीदरम्यान पत्रकारांशी बोलताना श्री.राणे म्हणाले, १९९० मध्ये नारायण राणे यांच्या माध्यमातून देवबाग गावचे सागरी अतिक्रमणापासून संरक्षण होण्यासाठी बंधारा बांधण्यात आला होता. त्यानंतर गेल्या काही वर्षात याठिकाणी कोणत्याही प्रकारचा बंधारा झालेला नाही हे दुर्देव आहे. सागरी अतिक्रमणापासून देवबाग गावचे संरक्षण करणे काळाजी गरज आहे. त्यादृष्टीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निधीतून 1 कोटी रुपये खर्च करून अत्यावश्यक त्या ठिकाणी बंधारा घालण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावून गावचे संरक्षण करण्यात येणार आहे असे श्री. राणे यांनी स्पष्ट केले.

देवबाग मोबारवाडी येथे पर्यटकांसाठी सुसज्ज अशी जेटी व्हावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी श्री. राणे यांच्याकडे केली. त्या अनुषंगाने आवश्यक तो प्रस्ताव तयार करावा. याबाबत पाठपुरावा करून पर्यटन जेटीचे कामही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे श्री. राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − twelve =