You are currently viewing शिवसेनेच्या विरोधानंतरही नवोदयची परीक्षा सुरळीत

शिवसेनेच्या विरोधानंतरही नवोदयची परीक्षा सुरळीत

शिवसेनेकडून पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा

परीक्षा केंद्रावर पालक शिक्षकांची मोठी गर्दी

कणकवली

कणकवली शहरात एस एम हायस्कूल मध्ये नवोदय विद्यालय परीक्षा केंद्रावर शिवसेनेच्या विरोधाच्या इशाऱ्या नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. शिवसेनेच्या इशाऱ्यामुळे या परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर एकत्र येत सुरुवातीला परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बोगस प्रवेश घेतल्याचा आरोप करत त्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यास विरोध असल्याचे सांगितले. व त्या नंतर चुकीच्या पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर कारवाई करा अशी मागणी करत शिवसेनेने आपली आक्रमक भूमिका मांडली.

नवोदय विद्यालयातील परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रवेश घेतल्याचा आरोप करत शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने प्रवेश प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान आज सकाळी एस एम हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जमण्याचे आवाहन सुजित जाधव यांनी केले होते. त्यानुसार शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, माजी नगरसेवक भूषण परूळेकर यांच्यासह शिवसैनिक एस एम हायस्कूल जवळ एकत्र झाले.

यावेळी नवोदय विद्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्यांशी चर्चा करत 15 मे पर्यंत सदर विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याची प्रवेश प्रक्रिया नियमानुसार असल्याच्या निकषांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज परीक्षा झाली तरी जर निकषात बसत असल्या बाबत ची कागदपत्रे संबंधित पालकानी न दिल्यास सदर विद्यार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती या परीक्षा केंद्रातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या प्रश्नी संबंधित विद्यार्थी स्थानिक असल्यास संदर्भात आवश्यक ती कागदपत्रे व्हेरिफिकेशन करून घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

या प्रश्नी आज दुपारी पालक मंत्री व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत संबंधित बोगस प्रवेश घेणाऱ्या परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. अखेर शिवसेनेने विरोध करून देखील या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरू झाली. मात्र शिवसेनेच्या इशाऱ्यामुळे परीक्षा केंद्रावर तालुक्यातील नवोदयच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यात या केंद्राच्या शिक्षकांनी देखील गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर या परीक्षा केंद्रावर पोलीस निरीक्षक आर टी हुलावले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. चव्हाण, मंगेश बावदाने श्री राऊत, श्री झोरे आदी पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा