You are currently viewing वेंगुर्लेचा सुपुत्र तेजस मेस्त्री बनला सिंधुदुर्गातील पहिला संगीत “एम.ए गोल्ड मेडलिस्ट”…

वेंगुर्लेचा सुपुत्र तेजस मेस्त्री बनला सिंधुदुर्गातील पहिला संगीत “एम.ए गोल्ड मेडलिस्ट”…

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षण; हिंदुस्थानी शास्त्रीय गायन विषयात पदवी…

वेंगुर्ले

हिंदुस्थानी शास्त्रीय गायन विषयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिला संगीत “एम.ए गोल्ड मेडलिस्ट” बनण्याचा बहुमान वेंगुर्ल्याचा सुपुत्र तेजस मेस्त्री याने मिळविला आहे. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुल विभागातून त्याने ही पदवी प्राप्त केली. दरम्यान त्याच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
तेजस विजयानंद मेस्त्री याची संगीतातील शिक्षणाची सुरुवात वेंगुर्ले येथील सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे यांच्याकडे २००७ सालापासून झाली. त्यांच्या मार्गदर्शनातून त्याने संगीत विशारद पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर संगीत विषयातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ललित कला केंद्र गुरुकुल पुणे येथे २०१८ या साली प्रवेश घेतला. तेथे त्याला ३ वर्ष डॉ. केशवचैतन्य कूंटे, हेमा देशपांडे , श्री.रोहन चिंचोरे तसेच ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रविण भोळे यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. तर पुणे विद्यापीठाचे मान्यताप्राप्त गुरू आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे जेष्ठ शिष्य पं. हेमंत पेंडसे यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रीय गायनाचे शिक्षण मिळाले. दरम्यान नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार तेजसने संगीत विषयातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण विशेष योग्यता श्रेणीने पूर्ण केले असून ललित कला केंद्र विभागामध्ये प्रथम येण्याचा मान त्याने मिळवला आहे. व यासाठी पुणे विद्यापीठाकडून त्याला सुवर्णपदक जाहीर झाले असून पदवी प्रदान समारंभामध्ये त्याला सन्मानित करण्यात येणार आहे.
तेजस मेस्त्री याचे पुढील गायनातील शिक्षण पं हेमंत पेंडसे, डॉ. केशवचैतन्य कुंटे, सौ अनघा गोगटे, सौ सुचेता अवचट, श्री राजीव आत्मज इत्यादी गुरुंपाशी चालू आहे. या मिळालेल्या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून वेंगुर्लेतील चिंतामणी संगीत विद्यालयाचे संचालक नीलेश पेडणेकर यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा