You are currently viewing माणसाचा जन्म कशासाठी?

माणसाचा जन्म कशासाठी?

 

 

🎯 *योग्य मार्गदर्शन,सुसंगती व तडजोडवृत्ती या तीन गोष्टी मानवी जीवनात अत्यंत व नितांत आवश्यक आहेत.*

🎯प्रथम आपण मार्गदर्शनाचा विचार करू.वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की, माणसाला योग्य मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे, याचीच त्याला जाणीव नाही. उलट आपल्याला सर्वकाही कळते व आपल्याला कोणी काही सांगण्याची गरज नाही, असेच माणसांना वाटत असते व हिच खरी मानवी जीवनातील शोकांतिका होय. याचे मुख्य कारण असे की, *संसारात काय किंवा परमार्थात काय,चुकीचे मार्गदर्शन मिळाले तर वेळेचा, पैशाचा व कष्टाचा अपव्यय होतो. याच्या उलट योग्य वेळी अचूक मार्गदर्शन मिळाल्याने वेळ, श्रम व पैसा सत्कारणी लागून माणूस सर्वार्थाने सुखी व यशस्वी होतो.*

🎯आता आपण संगती संबंधी थोडक्यात विचार करू. *संगतीचा महिमाच सामान्य लोकांना कळत नाही, हीच मोठी दुर्दैवाची गोष्ट होय. संगत धरण्यात माणसाचे हित आहे तसा त्याचा घातही आहे.* संगत धरण्यात माणूस थोडा जरी बेसावध राहिला तरी सुद्धा तो सर्व शिकाऱ्यांचे म्हणजे लबाड लोकांचे सावज बनू शकतो. *दुर्जन लोकांची संगत मिळते सहज व टिकते कायम, याच्या उलट सज्जन लोकांची संगत मिळणे कठीण व टिकणे त्याहूनही कठीण असते. माणसाला अधोगतीला नेण्याचे किंवा त्याला उत्कर्ष व उन्नती प्राप्त करून देण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे.*’भिड भिकेची बहीण’ अशी एक म्हण आहे. दुर्जन लोकांच्या संगतीत माणसे भिडेला बळी पडून व्यसनी व दुराचारी बनतात व शेवटी भिकेला लागतात. *थोडक्यात, माणसाला जर स्वतःचे हित सांभाळायचे असेल तर कुठल्याही प्रकारच्या भिडेला बळी न पडता कुसंगती टाळली पाहिजे व प्रयत्नपूर्वक सज्जन लोकांची संगती प्राप्त करून घेतली पाहिजे. सुसंगतीला पर्याय नाही, हे प्रत्येक माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे.*
🎯आता आपण तडजोड वृत्तीसंबंधी थोडक्यात विचार करू. *जीवनाला दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजे तडजोड होय. तडजोड वृत्ती हे शहाणपणाचे द्योतक आहे.* ज्यांच्याजवळ तडजोड वृत्ती नसते त्यांच्या जीवनात, अपवाद सोडल्यास मोठ्या प्रमाणावर गंभीर व तापदायक घटना निर्माण होणे अटळ असते. *तडजोडवृत्तीचा अभाव हे अज्ञान व अहंकार यांचे द्योतक असते. म्हणून ज्यांच्याजवळ तडजोडवृत्ती असते ते जीवनात सर्वत्र व सर्व क्षेत्रात सुखी व यशस्वी होतात, याच्या उलट ज्यांच्याजवळ तडजोडवृत्तीचा अभाव असतो त्यांना जीवनात सर्वत्र व सर्व क्षेत्रात वैफल्य, नैराश्य, वैताग, अपयश व दुःख प्राप्त होते.* तडजोड करणे म्हणजे नेभळटपणाचे दर्शन घडविणे नव्हे किंवा अन्याय, दुराचार व अत्याचार यांना पाठिंबा देणे नव्हे. *तडजोड वृत्तीच्या धारणेने सुवर्णमध्य साधून सर्वांचे हित व कल्याण साधणे, हेच जीवनविद्येला अभिप्रेत आहे.*

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा