You are currently viewing आंबा

आंबा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री प्रज्ञा करंदीकर, बेंगलूरु यांची अप्रतिम काव्यरचना

वसंत बहरता गर्भारे हिरवी
फांदी फांदी वृक्षाची
पानापानातून मोहरे गंध
चाहूल लागते आंब्याची

देखणी अंगकाठी काळीज बाठी
मधुर रसना खेळवी ओठी
भाळती रुपावर कित्येक ललना
राजा फळांचा प्रसिद्धी मोठी

मिरवत मुहूर्तावर येतो बाजारी
वाजतगाजत गोड साखरी
भासतो सांज गोकुळी यावा
कृष्ण छेडत छेडत मधूर बासरी

स्वप्न प्रेयसीच्या भेटीचे
साकार व्हावे साखर मिठीत
तशी पंचपक्वांनाची पूर्ती
होते खवय्यांची आमरसपुरीत

कैरीचा होतो आंबा ,सोडतो
सौंदर्याची छाप मनामनावर
आंबट गोडाचे गारुड घुंगरात
रंगते लावणीच्याही फडावर

डाळ,पन्हे,लोणचे,मुरंबा
रुपे निराळी ,रसना तृप्तीची
चव चाखता डोळे मिटूनी
अनुभूती सुंदर स्वर्ग प्राप्तीची

रत्नागिरी ,गोवा कर्नाटकापेक्षा
देवगडचा गोडवा गावा
साटा,पोळी,मावा करुन
वर्षभरांसाठी साठवून ठेवावा

पायरी,बलसाड,निलम,पायरी
चुलत भावंडे हापूसची सारी
घराणे एक तरी नाही राजकारण
हाणामारी,एकोप्याने नांदतात सारी

कुळ कुठले,कुठली जात पेक्षा
स्वादिष्ट स्वभावाला द्यावी दाद
वैर याचे नसतेच कुणाशी
फक्त असतो गोड संवाद

पर्वणीच म्हणायची खवय्यांना
आंबा महोत्सव सोहळा स्वादाचा
चव,रुची,स्वादात अग्रभागी
आंबा मुद्दा नसतोच वादाचा

प्रज्ञा नरेंद्र करंदीकर
बंगलूरू

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 14 =