You are currently viewing माणूस एकटा पडतोय

माणूस एकटा पडतोय

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…..लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य कवी लेखक दीपक पटेकर यांचा अप्रतिम लेख

पहाट होते झाडांवरून पक्ष्यांचे मंजुळ स्वर कानात पडू लागतात. कुठल्यातरी झाडावरून एखादा कोकिळ पक्षी सुमधुर गायन करतो आणि त्या गाण्याच्या सुरांनी जाग येऊन घरातला कर्ता पुरुष आणि स्त्रिया उठतात. बाया नेहमीप्रमाणेच न्हाणी घरातील चुली खाली विस्तव पेटवतात तर पुरुष गुरांच्या गोठ्यात गुरांना पाणी देण्यापासून गोठा साफ करणे… दूध काढणे…आदी कामे आटोपून… देवपूजा करून दिवसभराच्या कामासाठी घराबाहेर पडतात. नित्याचंच व्हायचं घरातील पुरुष आणि स्त्रियांचा रोजच्या कामाचे नियोजन… मोबाईल नव्हते तेव्हा माणसे माणसांशी बोलायची अगदी समोरासमोर…आजूबाजूला बसून एक दुसऱ्याच्या घरी जाऊन गप्पांची मैफिल रंगायची…दुःख वाटून घ्यायची आणि सुखात आनंदात हसायची…परंतु आज मात्र माणूस एकटा दिसतो…दिवस बदलले विज्ञानाने आपले अविष्कार दाखवले.. घरातील सणाला सोहळ्याला सर्वच कार्यक्रमाला एकत्र असणारी माणसे आज मात्र आपापल्या घरात आपले सण सोहळे साजरे करू लागली. एकत्र कुटुंब ही संकल्पनाच नाहीशी झाली सगळ्या सणांना व्यावहारिक आणि मॉडिफाइड नावे मिळाली.
खरंच माणसाजवळ सर्व काही असताना माणूस मात्र आज एकटा पडू लागला आहे.

*गुजरल्या क्षणांची कधी न केली मी तक्रार आयुष्याशी*
*तसा तरी कुठे केला होता मी करार आयुष्याशी*

असं म्हणत घरातील वयस्कर माणसं स्वतःच्या मनाची समजूत घालून घेत असतात.
*तरुणपणी “वाढदिवस”* आणि *म्हातारपणी “काढदिवस”* काहीसे असेच आजचे समीकरण बनले आहे. जुनी माणसे आरती करून कुंकूवाचा टिळा लावून औक्षण करायची…परंतु आजचे तरुणाईचे वाढदिवस म्हणजे चवीने खायचा केक सुद्धा तोंडाला फासून वाढदिवस साजरे केले जातात. सर्वच बदलत चालले आणि या बदलत्या दुनियेत घरातील वयस्कर माणसे म्हणजे अडचणीची आणि अडगळीची वाटू लागली. आई-वडील असो अथवा घरातील वयोवृद्ध कोणीही आजकाल नव्या पिढीतील मुलं आपली लग्न झाली की नव्याने आपले संसार वेगवेगळ्या घरट्यात थाटतात. स्वतंत्र विहार करण्याची आपले स्वातंत्र्य जपण्याची त्यांची हौस भारी असते…आपले संसार फुलल्यावर ज्यांनी आपल्याला त्या योग्यतेचं बनवलं त्यांनाच विसरतात. आयुष्याचा आधार म्हणून ज्यांच्याकडे आशेने पहायचं ती मुलं आपल्या उतारवयात आपल्याला सोडून गेलेली पाहताना आई-वडील निराश होतात. आपली दुःख आणि वाहणारे अश्रू ही डोळ्यात गोठवून टाकतात. नैराश्य तरी किती दिवस लपून राहणार कधीतरी ते नैराश्य मनात असंख्य विचार घेऊन मनाला मनाविरुद्ध वागण्यासाठी तयार करतात आणि मनात नसलं तरी एकटी पडलेली वयोवृद्ध माणसे काहीतरी चुकीचा निर्णय घेतात. आपण एकटे पडलो आहोत ही भावना मनात घर करते त्यातूनच जीवन संपवून टाकतात…

*आयुष्य मनसोक्त जगून घ्या*
*बाकी नशिबावर सोडून द्या*

खरंच हे म्हणणं किती सहज आणि सोपे वाटते परंतु ज्यांनी आयुष्यात खस्ता खाऊन मुलाबाळांना वाढवलेलं असतं. मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा काढलेला असतो… ती माणसं झाडावरच्या घरट्यातून चिमणीच्या पिल्लांची उडून जावं आणि त्या घरट्याकडे कायमची पाठ फिरवावी… तशीच निखळ आनंदाने भरलेल्या घरातून तरुण मुलांनी आपल्या आई-वडिलांना एकत्र टाकून बाहेर गेल्यावर खरच मनसोक्त जगतील का? बाकी सारी दुःख नशिबावर सोडून देतील का? हे प्रश्न प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनाला विचारले पाहिजेत. कारण रात्री फुललेल्या फुलाला सुद्धा माहिती नसतं की सकाळी ते मंदिरात देवाच्या पाया वर जाणार आहे की कोणाच्या तिरडी वरून स्मशानाची यात्रा करणार आहे. घर सोडून वेगळं रहायला जाणारी पाखरे जाताजाता बोलून जातात *”आपला जिव्हाळा कायम आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या”.* परंतु तळहाताच्या फोडा सारखे तुम्हाला जपणारे तुमचे आई वडील जेव्हा उतारवयात येतात तेव्हा खरंच स्वतःची काळजी घेऊ शकतात का? उतार वय म्हणजेच बालपण नवे का त्यांच्यासाठी? ज्याप्रमाणे बालपणात आपल्या आई-वडिलांना आपली काळजी घेतलेली असते, अगदी त्याच प्रमाणे आपणही त्यांच्या उतारवयात त्यांची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. माणसाला आधार केव्हा लागतो? जेव्हा माणूस निराधार झाला अशी भावना त्याच्या मनात उत्पन्न होते तेव्हाच तो आधार शोधतो.
आपल्या तरुणपणात किंवा आपले लग्न झाल्यानंतर आपल्या आई वडिलांनी एक जरी रागात बोललेला शब्द मनाला लागला की मुलं आपला मार्ग निवडायला मोकळी होतात… बऱ्याचदा लग्नानंतर आपल्या आयुष्यात नव्याने आलेली पत्नी म्हणजेच सर्वस्व….असं मानून ज्या आई-वडिलांनी लहानाचं मोठं केलं….ज्यांनी २५ वर्षे सोबत केली..साथ दिली त्यांना २५ दिवसांच्या…२५ महिन्यांच्या सोबतीसाठी दूर लोटायचे का? कशी काय ही मुलं त्यांना क्षणार्धात विसरतात. अरे लहान मुलं खरं तर खूप काही शिकवत असतात…खरा धडा लहान मुलांकडूनच घेतला पाहिजे. आपल्या आई वडिलांचा मार खाऊन सुद्धा त्यांनाच बिलगतात… मग मोठेपणी एखादा रागात बोललेला शब्द एवढा मनाला का म्हणून लावून घ्यायचा? खरंच विचार करण्याची वेळ आलेली आहे, कारण तुम्ही आज जसे वागता तशीच भविष्यात तुमची मुले तुमच्याशी वागतील… आणि माणूस एकटा पडण्याची ही साखळी अशीच वर्षानुवर्षे पुढे चालत राहील. आपणच जर नाती जपली गोंजारली तरच नाती टिकतील…घट्ट होतील…बरोबर ना? आजकालच्या नव्या पिढीला घरातले जेवणापेक्षा हॉटेलचे जेवण आणि टीव्हीवरील सिनेमापेक्षा आयनॉक्स, पीव्हीआर मधले महागडे सिनेमे आवडतात…आजकाल ती फॅशन झाली आहे. परंतु स्वतःच्या आईवडिलांसाठी दोनशे रुपयांची औषधे घेतानासुद्धा मागेपुढे पाहणारी पिढी पाचशे रुपयांचे तिकीट काढून सिनेमा पाहायला बसतात… दीडशे रुपयाचा आइस्क्रीमचा फॅमिली पॅक घरात आणला तर घरातली सात-आठ माणसे सहज खाऊ शकतात…. परंतु दीडशे रुपयाचा कसाटा बाहेर खाऊन आनंद लुटण्यात आजची नवी पिढी धन्यता मानते. हजारो रुपयांचा कुत्रा आणि मांजर घरात आणतील… त्यांना लागणारे चिकन-मटण, प्रोटिन्स अगदी वेळेवर देतील परंतु जन्मदात्यांना मात्र अन्नासाठी वळवळ करायला लावतील.
अशी जन्माला आली आज काल नवी पिढी हा यातही काही अपवाद असतात…नसतातच असेही नाही. परंतु केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतपत… मेल्यानंतर पिंड दानाच्या वेळी अगदी आपल्या आई वडिलांना जे आवडत होतं….ते खाणं करून कावळ्याला घालतात…परंतु जिवंतपणी तेच खाणे आई वडिलांसमोर स्वतः खातात…अन आई बापाला मात्र आपल्या तोंडाकडे पाहायला लावतात… अशी सुद्धा जन्मली आहे आजची नवी पिढी.
खरच सांगतो मित्रांनो नाती जपत चला… कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कोणी फोटो काढणारा सुद्धा मिळत नाही. कदाचित म्हणूनच मोबाईल कंपन्यांनी देखील सेल्फीची कल्पना सत्यात उतरवली असेल. मग अशावेळी सेल्फी काढून दात मिचकावून स्वतःलाच आनंद लुटावा लागतो… एकट्यानेच… आणि यावरही कहर म्हणजे… याला सुद्धा लोक आता “फॅशन” म्हणू लागलेत… जिथे टाळी वाजवायची म्हटलं तरी दोन हातांची गरज असते तिथे आनंद तरी कसा एकटा माणूस लुटू शकतो?
आभासी दुनियेत जगणारी ही नवी पिढी या सत्याचा स्वीकार कधी करणार हे देवच जाणे….!
पण….
सत्य नाकारता नाकारता माणूस मात्र एकटा पडत चालला आहे…!
एकट्याने जगता जगता…जीवन संपवत चालला आहे….!

©【दीपि】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =