You are currently viewing महाराष्ट्राच्या राजकारणातील दुर्दैवी घटना

महाराष्ट्राच्या राजकारणातील दुर्दैवी घटना

*राष्ट्रवादी प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर*

 

महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणात ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं, त्या आमच्या नेत्याच्या म्हणजेच आदरणीय खासदार शरदराव पवार साहेबांच्या घरावर झालेला आजचा हल्ला हा फक्त निषेध करण्यापुरताच नाही तर निंदनीय आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही दुर्दैवी घटना आहे, अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर यांनी दिली.

महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्ष सत्तेसाठी चाललेल्या राजकारणाचा वास येतो. खरं म्हणजे शरदराव पवार सातत्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत.याही संपकाळात त्यांनी सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा त्यांच्यावरील अन्याय कमी व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. परंतु आज झालेल्या प्रकारामुळे मात्र महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर सतत जाणीवपूर्वक खालवण्याचा प्रयत्न काही राजकारणी मंडळी करत आहेत असंच वाटतं. सुरुवातीपासून न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल दिलेल्या न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केलं होतं. काल त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव केला होता. आपला विजय झाला अशाच प्रकारे त्यांची कृती होती,मग एकाच रात्रीत एवढा आक्रोश का याचा विचार करता अस लक्षात येतं की, आघाडी सरकार स्थापनेमागे ज्यांनी फार मोठे प्रयत्न केले,गेले अडीच वर्ष महाआघाडी सरकारवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य ज्यानी दाखवलं, त्यांना विचलित करावं यासाठीच काही राजकीय शक्तींनी केलेला हा डाव आहे, यात शंका नाही. असा आरोपही काका कुडाळकर यांनी केला आहे.

आजही आमचे नेते शरदराव पवार एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. सर्वांनी संयम राखावा असं आवाहनही त्यांनी केलं. यातूनच या नेत्याचं मोठेपण दिसून येतं. अशा राष्ट्रीय नेतृत्वावर हल्ला होणे हे राजकारणातील मोठं दुर्दैव आहे.राजकारणातील जनहिताचा रास्ता सोडून सत्ता मिळालीच पाहिजे यासाठी जंग जंग पछाडलेली मंडळी कोणत्या स्तराला जाऊ शकतात हे आजच्या घटनेने उभ्या महाराष्ट्रने पाहिलेल आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा फार मोठी आहे,ती अबाधित राखण्यासाठी यापुढे महाराष्ट्रातील जनतेनं आता आपल्या अस्मितेची लढाई लढली पाहिजे. पुन्हा एकदा आमच्या नेत्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो आणि हे षडयंत्र रचणार्‍या शक्तीचा बिमोड केल्याशिवाय राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही हेही ठासून सांगतो. असा इशारा काका कुडाळकर यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा