You are currently viewing महाविद्यालयाच्या विकासातुन युवकांची स्वप्ने साकार करणार – नगराध्यक्षा कु. नेहा माईनकर

महाविद्यालयाच्या विकासातुन युवकांची स्वप्ने साकार करणार – नगराध्यक्षा कु. नेहा माईनकर

वैभववाडी

महाविद्यालयातील तीन वर्षे ही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची असतात.अभ्यासाबरोबरच अभ्यासेत्तर उपक्रमातून स्वतः ला घडवता येते.माझ्या जडणघडणीत आणि यशात वैभववाडी महाविद्यालयाचे खुप मोठे योगदान आहे. महाविद्यालयाच्या विकासातून युवकांची स्वप्ने साकार करण्याचा पण प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन वैभववाडी महाविद्यालय वयाच्या माजी विद्यार्थीनी तथा वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कु.नेहा माईणकर यांनी केले.
आज बुधवार दिनांक ६ एप्रिल रोजी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था स्थानिक समितीचे सचिव श्री.प्रमोद रावराणे यांच्या प्रेरणेने आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी सन्मान सोहळा प्राचार्य डॉ.सी. एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. वैभववाडी नगरपंचायतीच्या नुतन नगराध्यक्षा कुमारी नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष श्री. संजय सावंत, बांधकाम सभापती श्री.विवेक रावराणे, आणि नगरसेवक श्री. रणजीत तावडे या माजी विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील इतिहास विभाग व आयक्युएसी विभागाने स्वातंत्र्याची ७५ वर्षे या विषयावर घेण्यात आलेल्या एक दिवसीय आंतरविद्याशाखीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेमध्ये सादर केलेल्या शोध निबंध पुस्तिकेचे प्रकाशन तसेच प्राणीशास्त्र विभागामार्फत घेण्यात आलेल्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफी या स्पर्धेच्या विजेत्यांचा ही सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कोषाध्यक्ष श्री अर्जुन रावराणे, स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री सज्जनकाका रावराणे, स्थानिक समितीचे सचिव श्री प्रमोद रावराणे, वैभववाडीच्या सभापती सौ. अक्षता डाफळे, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व जि.प. सदस्य श्री. सुधीर नकाशे, श्री.राजेंद्र राणे आदी मान्यवर उपस्थित होते.


माजी विद्यार्थी सन्मान सोहळ्यातील सत्काराला उत्तर देताना बांधकाम सभापती विवेक रावराणे यांनी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम तातडीने नगरपंचायतीने हाती घेतले असून ते लवकरच पूर्णत्वाला जाईल याची ग्वाही दिली. उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून समाजातील विविध मान्यवरांनी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला व आपणही या वाटचालीचा एक साक्षीदार असून महाविद्यालयाच्या विकासामध्ये वाटचालीमध्ये योगदान दिल्याचे स्पष्ट केले. आजही महाविद्यालयाचा परिसर, रस्ता व विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण या बाबी अग्रक्रमाने पूर्ण केल्या जातील याचे आश्वासन दिले. तसेच नगरसेवक श्री.रणजीत तावडे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी व वैभववाडी तील युवकांसाठी क्रीडांगणाचे कार्य मार्गी लावण्यासाठी स्वतः योग्य तो पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.
या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मा.श्री अर्जुन रावराणे यांनी महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या क्षेत्रांमध्ये सर्वोच्च स्थान मिळवून समाजाची सेवा करून महाविद्यालयाचे नाव मोठे करावे आणि महाविद्यालयाची कीर्ती सर्वदूर पसरावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सज्जनकाका रावराणे यांनी महाविद्यालयाच्या जडणघडणीतील महत्त्वाच्या क्षणांना उजाळा दिला. समितीचे सचिव मा. प्रमोद रावराणे यांनी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय हे संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांचे आशास्थान व प्रेरणास्थान आहे. त्यामुळे माजी विद्यार्थी व वैभववाडी नगरपंचायत यांच्या माध्यमातून विकासाचे सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत आणि महाविद्यालय विकासामध्ये आपले योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य डॉ. सी एस काकडे यांनी विद्यार्थी ही महाविद्यालयाची संपत्ती असून ती संवर्धित झाली पाहिजे. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनीही अशी मोठी स्वप्ने पाहायला हवीत तरच स्वतःचा व कॉलेजचा विकास होईल असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा. डॉ. एम. आय. कुंभार यांनी केले तर प्रा.आय एल भोसले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. एस. एस. पाटील यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने या सन्मान सोहळ्याची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा