You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीन केल्या तहसीलदारांकडे सुपूर्त…

सावंतवाडी तालुक्यातील रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीन केल्या तहसीलदारांकडे सुपूर्त…

ग्रामीण भागात इंटरनेट अभावी वितरणात अडथळे; लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसल्याने दुकानदार आक्रमक…

सावंतवाडी

तालुक्यातील ग्रामीण भागात सक्षम नेट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरित करताना रेशन दुकानदारांना अडथळे येत आहेत. याकडे संबंधित प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधून सुद्धा कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. त्यामुळे संतप्त रेशन धान्य दुकानदारांनी आज आपल्या ताब्यातील ई-पॉस मशीन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सुपूर्त केल्या.

यावेळी सावंतवाडी तालुका रेशन दुकानदार संघटनेने अध्यक्ष गणपत राणे, उपाध्यक्ष तन्वी परब, सचिव अमेय गावडे, खजिनदार अनिकेत रेडकर, सदस्य सोमनाथ परब, राघो परब, संतोष गावडे, संजय मळीक, शिवा लाड, सुरेश शेटवे, संगीता कोकरे अर्जुन सावंत आदी रेशन दुकानदार उपस्थित होते.

ई-पॉस मशीनला दुकानांमध्ये नेटची सुविधा उपलब्ध करून देणे, या मशीनमधील डाटा सुधारून देणे, जिल्ह्यात नवीन सुधारण ईश्टांक वाढवून देणे, दुकानदारांकडून चुकीच्या पद्धतीने धान्य खरेदी करून घेऊ नये. पंतप्रधान गरीब धान्य योजना वितरण कमीशन मिळणे आदी रेशन दुकानदारांच्या प्रमुख मागण्या आहेत. तसेच डिसेंबर २०२१ पासून ऑनलाईन वितरीत होऊ न शकलेले नियमीत व मोफत धान्य वितरणासाठी कॅरी फॉरवर्ड स्वरूपात ई पॉस मशीनवर उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्या मधील वादाचे प्रसंग कमी होतील. कालबाह्य झालेल्या ई पॉस मशीनमुळे धान्य वितरणात नियमितता राहिलेली नाही.

या मशीनला येणाऱ्या सततच्या तांत्रिक समस्यामुळे विशेषतः सर्व्हर डाऊन व आधार प्रमाणीकरण न होणे. तसेच इतर धान्य वितरण योजनांच्या कामाच्या ताणामुळे ऑनलाईन वितरण वेळेत होत नाही. या पॉस मशिनमुळे धान्य वितरण विस्कळीत होत असुन महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत ५० टक्केही धान्य वितरण होत नाही. काही ठिकाणी प्रत्यक्ष दुकानात धान्य उपलब्ध आहे. परंतू ई पॉस मशिनवर धान्य नाही तर काही ठिकाणी ई पॉस मशिनवर धान्य अपलोड केलेले दिसते. प्रत्यक्ष दुकानात धान्यच पोहचत नाही. यात ग्राहकांच्या रोषाला दुकानदारांना सामोरे जावे लागते. अशी खंत यावेळी उपस्थित रेशन दुकानदारांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा