You are currently viewing ज्ञानेशांचा संदेश

ज्ञानेशांचा संदेश

हृदयगत

 

*जन्म आणि मृत्यु या दोन तीरांमधून जीवनाची नदी सुखसागर परमात्म्याला भेटण्यासाठी परम वेगाने धांवत असते.परंतु दुर्दैवाने जीवाची धांवण्याची दिशा मुळांतच चुकल्यामुळे जन्मभर धडपड करून सुद्धां त्याला जे पाहिजे असते ते सुख मिळत नाही आणि सुख न मिळण्याच्या असमाधानात त्याला हा लोक सोडून जाण्याची वेळ येते. या फजितीचे वर्णन तुकाराम महाराजांनी “किती वेळां जन्मा यावे किती व्हावे फजित” या शब्दांत उत्कृष्ट रीतीने केले आहे.मनुष्य जन्माला येतो तो अखंड सुख मिळविण्याच्या हेतूने व हे ध्येय प्राप्त करून घेईपर्यंत त्याची जन्म-मरणाची धडपड सारखी चालू रहाते.मनुष्याला सुख मिळत नाही याचे कारण सुख हे काय आहे याचाच त्याला बोध होत नाही.सुख कशात आहे असे जर आपण सुशिक्षित किंवा अशिक्षित माणसाला विचारले तर तो चटकन सांगेल की,सुख हे मानण्यात आहे, आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, सुख हे मानण्यात आहे या कल्पनेतच माणसाचे सर्व दुःख भरलेले आहे.तो कशात तरी सुख आहे अशी कल्पना करून ते मिळविण्याचा प्रयत्न करतो.ज्या विषयात सुख आहे अशी कल्पना करतो तो विषय जर प्राप्त झाला तर त्यात सुख नाही हे त्याला अनुभवास येते व जर तो विषय मिळाला नाही तर त्याला दुःख होते. सामान्य मनुष्याची अशी कल्पना असते की,सुख हे बाहेर जगामध्ये जे नाना पदार्थ आहेत त्यांत अडकलेले,आणि ते जर मिळवावयाचे असेल तर ते पदार्थ संपादन करून मग त्यांतून ते सुख वेचायचे.ही कल्पना मनुष्याची एकदां का निश्चित झाली की,मनुष्य नाना प्रकारचे पदार्थ म्हणजे विषय मिळविण्याच्या खटपटीला लागतो. अर्थात् सर्व पदार्थ पैशाने मिळू शकतात म्हणून सरते शेवटी मनुष्य हा पैशाच्याच मागे लागतो.परंतु पैसा किंवा पदार्थ हे आपणाला सुख देऊ शकत नाहीत हे मनुष्याला शेवटी अनुभवाने कळते.याचे कारण असे की,ज्याला आपण सुख असे समजतो ते सुख मिळविण्यासाठी मनुष्याला चार अटी पूर्ण कराव्या लागतात.पहिली अट अशी की,तो विशिष्ट पदार्थ (विषय) आपणास उपलब्ध असावयास पाहिजे.दुसरी अट म्हणजे तो प्राप्त करून घेण्यास जवळ पैसा पाहिजे.तिसरी अट तो भोगण्यास इंद्रिय पाहिजे व चौथी अट म्हणजे मन त्या विषयाचे ठिकाणी स्थिर झाले पाहिजे.या चार अटींपैकी एक जरी अपूर्ण राहिली तरी सुद्धां आपणास सुख प्राप्त होणार नाही.कल्पना करूं की,आपल्याला नाटकाचे सुख पाहिजे आहे.आता हे सुख जर मिळवावयाचे असेल तर प्रथम म्हणजे जे नाटक आपणास पहावयाचे आहे ते कुठे तरी असले पाहिजे,तेथे प्रवेश मिळविण्यासाठी जवळ पैसे हवेत,पाहण्यासाठी डोळे व कान पाहिजेत व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटक पहाण्यात मन स्थिर झाले पाहिजे. सामान्य मनुष्याला या सर्व अटी पूर्ण करणे कठीण व त्यातूनही त्याने त्या कांही तरी खटपटी करून पूर्ण केल्याच,तर ते सुख टिकणे त्याहूनही कठीण.याचे कारण असे की,विषय हा सर्व काळ उपलब्ध होऊ शकत नाही व झाला तरी त्या ठिकाणी मन फार काळ रमत नाही. नाटक झाले तरी ते सर्व काळ असू शकत नाही व आपले मन त्या ठिकाणी सतत रमत नाही.नाटक पाहता पाहता त्याचाच नंतर वीट येऊ लागतो.कारण मनुष्याचे मन हे मुळांतच चंचल आहे.ते कांही काळ त्या विषयावर स्थिर होते व तेवढ्या वेळेपुरते त्याला सुख अनुभवता येते.पण त्या विषयाचा,चंचल मनाला लगेच कंटाळा येतो व ते सुखासाठी दुसऱ्या विषयांकडे पाहू लागते.अशा रीतीने मर्कट ज्याप्रमाणे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारीत राहतो,किंवा भ्रमर एका फुलावरून दुसऱ्या फुलावर भ्रमण करीत असतो, त्याप्रमाणे आपले मन एका विषयावरून दुसऱ्या विषयावर सुखाच्या आशेने सारखे फिरत रहाते व अशा अस्वस्थ मनाला जन्मभर शांतीसुख मिळत नाही. ज्या सुखाचे वर वर्णन केले आहे त्याला विषयसुख असे म्हणतात, व सामान्य माणसे म्हणजे शास्त्रांत ज्यांना बद्ध असे म्हणतात तो सर्व या विषयसुखाच्या मागे असतात.या विषयसुखाच्या पलीकडे सुखाचे आणख दोन श्रेष्ठ व श्रेष्ठतम असे प्रकार आहेत.पहिला प्रकार मुक्तीसुखाचा व दुसरा भक्तीसुखाचा.पहिल्या प्रकारच्या सुखाचा विचार आपण प्रथम करू-मुक्तीसुख ज्याला म्हणतात विषयसुखापेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ असते,आणि हे सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे समाधी.विषयसुख मिळविण्यासाठी वर सांगितलेल्या चार अटी पूर्ण कराव्या लागतात व म्हणूनच ते सुख अत्यंत परावलंबी असे आहे.याच्या उलट समाधी लावून जे मुक्तीसुख मिळवावयाचे ते स्वावलंबी असते,कारण या सुखासाठी बाहेरच्या पदार्थांचा म्हणजे विषयांचा आलंब घ्यावा लागत नाही.गाढ निद्रेत माणसाला जे विषयातीत,द्वंद्वातीत असे निरालंबी सुख मिळते,त्याच प्रकारचे सुख समाधी अवस्थेत साधकाला प्राप्त होते.विषयसुखात विषयाचा आलंब (आधार) घेऊन मन कांही काळ स्थिर होते व स्वरूपाला नकळत स्पर्श करते. म्हणून तेवढ्या वेळेपुरते आपण सुख अनुभवू शकतो.पण हे सुख क्षणिक व फारच परावलंबी असल्यामुळे योगीजनांनी या सुखाचा त्याग केला व त्याच्या प्राप्तीचा स्वावलंबी मार्ग शोधून काढला.या मार्गाने जाणाऱ्या साधकाला मन स्थिर करण्यासाठी बाहेरच्या विषयांवर अवलंबून राहावे लागत नाही.तो आपले मन अंतर्मुख करून त्याला अभ्यासाने स्वरूपात विरवून टाकतो व अशा रीतीने जी समाधी साधली जाते तिच्या द्वारा साधक कांही काळ सुखरूप होऊन राहातो.याला मुक्तीमुख किंवा समाधीसुख असे म्हणतात.योगमार्गाने किंवा व्यतिरेकाच्या ज्ञानमार्गाने जाऊन समाधी द्वारा हे सुख अनुभवायचे असते.पण या मार्गात अडचण अशी की,जोपर्यंत साधक समाधी अवस्थेत असतो तोपर्यंतच तो सुखरूप होऊन राहातो,पण समाधीचा भंग झाला किंवा समाधीतून व्युत्थान झाले की तो सुखाला मुकतो.आणि म्हणूनच बद्धाचे विषयसुख किंवा सिद्धाचे मुक्तीसुख या दोहोंच्या पलीकडे असणारे श्रेष्ठतम असे जे भक्तिसुख किंवा प्रेमसुख तेच संतांनी आपलेसे केले.हे सुख प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे हे नामस्मरण.नामाने मिळणारे प्रेमसुख हे समाधी लावून मिळणाऱ्या समाधी सुखापेक्षा वेगळे आणि आगळे असे आहे. समाधी लावून योगी किंवा ज्ञानी ब्रह्मरूप होतो तर नामाने नामधारक ब्रह्मरसाचे अखंड पान करतो.म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात-*

 

*समाधिचे सुख सांडा ओवाळूनी ।*

*ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस ।।*

*विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस ।*

*पुढती पुढती आस सेवावी हें ।।*

 

*नामसंकीर्तनाने जे प्रेमसुख मिळते,त्याची प्रक्रिया काय हे आपण थोडक्यात पहाण्याचा*

*प्रयत्न करू-*

 

*विज्ञान (Science) असे सांगते की,या विश्वातील प्रत्येक वस्तू ही आपल्याच ठिकाणी स्पंद पावत असते.(Every thing in the world is in a state of vibration.) याचा अर्थ असा की, प्रत्येक वस्तूत जे परमाणू आहेत-जे अणू,रेणू व रसरेणू आहेत,ते त्या वस्तूत विशिष्ट पद्धतीने,विशिष्ट गतीने व विशिष्ट ‘दिशेने’ हेलावत असतात-स्पंद पावत असतात, vibrate होतात.या स्पंद होण्याच्या पद्धतीत,गतीत व ‘दिशेत’ विशिष्ट कारणामुळे फेरफार झाला तर त्या वस्तूचे रूप आणि स्वरूप पालटते. उदाहरणार्थ,ज्याला आपण लोखंड असे म्हणतो त्या लोखंडात असणारे अणू,रेणू व रसरेणू एका विशिष्ट पद्धतीने vibrate म्हणजे स्पंद पावत असतात व त्यांची फिरण्याची गती डावीकडून उजवीकडे असते.जर एखाद्या विशिष्ट प्रक्रियेने लोखंडातील अणू-रेणूंची फिरण्याची गती जर उलटविता आली म्हणजेच त्यांची फिरण्याची गती उजवीकडून डावीकडे फिरविता आली तर लोखंडाचे सोने होते. किमयागार लोखंडाचे सोने करतो किंवा परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते याचे कारण हेच होय.संथपणे वहाणाऱ्या पाण्यात जर गती निर्माण झाली तर त्या पाण्यातून विजेसारखी शक्ती निर्माण होते. एखादी वस्तू जर आकाशात सतत फिरवीत ठेवली तर ती वस्तू फिरत असतां एक प्रकारचा विशिष्ट आवाज होतो व कांही काळाने ती वस्तू आकाशातच अदृश्य होते, परंतु तोच विशिष्ट आवाज जर मुखाने किंवा अन्य प्रकाराने सतत काढण्याची व्यवस्था झाली तर आकाशात अदृश्य झालेला तोच पदार्थ पुन्हां साकार होतो.एखाद्या मनुष्याला अत्यंत क्रोध आला तर त्याच्या शरीरात विशिष्ट प्रकारच्या लहरी-स्पंद किंवा vibrations निर्माण होतात.अशा वेळी त्या मनुष्याचा चेहरा लालबुंद होतो,देह थरथर कापू लागतो,डोळे लाल होतात व त्याला धड बोलताही येत नाही.अशा मनुष्याचे रक्त सुद्धां विषारी बनते,इतके की,जर ते एखाद्या मांजराला किंवा कुत्र्याला टोचले तर तो प्राणी प्राणास सुद्धां मुकतो.अतिक्रोधाला बळी पडणारी माणसे रोगी होतात याचे कारण हेच होय.तुकाराम महाराज सांगतात -*

 

*”खवळलिया काम क्रोधी । अंगी भरती आधी व्याधी ।।”*

 

*तात्पर्य,विशिष्ट कारणांमुळे विशिष्ट प्रकारच्या लहरी स्पंद किंवा vibrations निर्माण झाल्या तर पदार्थांत किंवा माणसांत परिवर्तन होते,ही गोष्ट आज विज्ञानाने सिद्ध केली आहे.अखंड नामस्मरणाने किंवा नामसंकीर्तनाने नेमके तेच होते.कसे ते पहा – जीव हा ज्ञानरूप आहे व आनंद हे त्याचे स्वरूप होय. ज्ञानरूप जीवाला आनंदस्वरूपाची कळत किंवा नकळत जाण आहे, पण त्याचा भोग मात्र नाही.जवळ आहे पण मिळत नाही अशी जीवाची अवस्था आहे.हा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य आयुष्यभर खूप धडपड करतो, व शेवटी थकून जातो;परंतु तो आनंद त्याला मिळत नाही.एखादा कुत्रा स्वतःचीच शेपूट पकडण्याचा प्रयत्न करतो व ती जवळ असून सुद्धां त्याला मिळत नाही.शेपूट पकडण्याच्या प्रयत्नात तो कुत्रा शेवटी अक्षरशःस्वतःच्याच भोवती फिरू लागतो व अंती श्रांत होऊन जमिनीवर पडतो.अशीच अवस्था माणसाची झाली आहे.जवळ असलेला आनंद मिळविण्याच्या प्रयत्नात तो स्वतःच्या देहाभोवती विषयांच्या कनक,कांता,कीर्ती व सत्ता यांच्या कक्षेत फिरू लागतो, संसार चक्रात भ्रमण करू लागतो व शेवटी भोवळ येऊन निराश होऊन एक दिवस मरून पडतो.संत सांगतात,आनंद मिळविण्याचा हा मार्ग नव्हे.क्षीरसागरात देव-दैत्यांनी मंथन केले व त्यातून विष व अमृत दोन्ही बाहेर आली.त्याचप्रमाणे जीवाच्या ज्ञानघन चैतन्य सागरात विकाराच्या रवीने मंथन घडते तेव्हां त्यातून विष बाहेर पडते व जीवन दुःखरूप होते,उलट नामाच्या प्रेमाच्या रवीने जर तेथे मंथन झाले तर त्यातूनच अमृत बाहेर येते व जीवन सुखरूप होते.तात्पर्य, आनंद जवळ आहे व तो मिळविण्याचा मार्ग म्हणजे नामसंकीर्तन हाच होय.नामाच्या उच्चाराने सत्ताज्ञानात (देहाला व्यापून टाकणारे ज्ञानघन चैतन्य ) विलक्षण लहरी (Divine vibrations) निर्माण होतात आणि त्याची परिणती ज्ञानात आनंद व्यक्त होण्यात होते.म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात मोठ्या खुबीने ही प्रक्रिया सांगितली आहे.ती म्हणजे “मंथुनी नवनीता तैसे घे अनंता”. दह्याचे मंथन 4 हा लोणी प्राप्त करून घेण्याचा मार्ग,हवेचे आंदोलन हा वारा प्राप्त करून घेण्याचा मार्ग व लाकडाचे घर्षण हा अग्नी प्राप्त करून घेण्याचा मार्ग, त्याचप्रमाणे हरिला म्हणजे प्रेमानंदाला प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्ताज्ञानात मंथन म्हणजेच नामसंकीर्तन करणे हा होय.दह्याच्या पोटात मंथनापूर्वी लोणी असते पण ते अव्यक्त, अदृश्य,निराकार व निर्गुण असते. पण त्याचे मंथन केले जाते तेव्हां या दह्याच्या आंतून ते व्यक्त,दृश्य, साकार व सगुण होते.त्याचप्रमाणे या देहाच्या भांड्यात सत्ताज्ञानाचे म्हणजेच ज्ञानघन चैतन्याचे दही आहे व या चैतन्याच्या आंत-पोटात आनंदाचे लोणी आहे.पण हा आनंद सत्ताज्ञानात लोण्यासारखा ‘नुसता आहे’ म्हणजेच तो अव्यक्त,अदृश्य, निराकार व निर्गुण आहे.नामाच्या रवीने उच्चाराने-घोषाने संकीर्तनाने, या सत्ताज्ञानात मंथनाला सुरुवात होते.चैतन्याच्या लहरीच्या लहरी नामोच्चाराने ज्ञानघन चैतन्यात निर्माण होऊ लागतात.दिव्य नामाने या ज्या अद्भुत चैतन्याच्या लहरी निर्माण होतात,त्यांनी ज्ञानाच्या आंतून-पोटातून गोविंद म्हणजे प्रेमानंद नामधारकाला व्यक्त,दृश्य, साकार व सगुण होतो.म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात-*

 

*येऊनि अंतरी राहील गोपाळ । सायासाचे फळ बैसलिया ।। रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी । मंत्र हा उच्चारी वेळोवेळा ।।*

किंवा

 

*भावाचे मथिलें निर्गुण संचले ।*

*ते हे उभे केले विटेवरी ।।*

 

*पुंडलिकाने विठ्ठलाला विटेवर उभे केले त्याप्रमाणे नामधारक ज्ञानाच्या विटेवर कृष्णानंदाला म्हणजेच प्रेमानंदाला उभे करतो व या प्रेमसुखाचे लोणी अखंड सेवन करून जीवनात आनंदाची दिवाळी साजरी करतो.हा आनंद ज्यावेळी सुरुवातीला साधकाच्या अनुभवाला येतो त्यावेळी त्याची विलक्षण अवस्था होते.त्याचा चेहरा आरक्त होतो,देहावर रोमांच उभे राहतात,कंठ दाटून येतो व डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात. हा आनंद स्थिर झाला व ‘शरीरात’ मुरला की तेच प्रेमसुख होय.हे प्रेमसुख भोगण्यासाठी संत मुक्तीचा अव्हेर करतात व देवाजवळ पुन्हां पुन्हां जन्म मागतात.*

 

*मोक्ष तुमचा देवा । दुर्लभ तो तुम्ही ठेवा || मज भक्तीची आवडी । सेवा व्हावी ऐसी जोडी ।।*

 

किंवा

 

*कां रे न घ्यावा जन्म । प्रेम लुटावे नाम ।।*

*असे आपले मनोगत संत देवाजवळ व्यक्त करतात.*

 

*हा दिव्य आनंद सत्ताज्ञानात प्रकट होतो व जीवनात संपूर्ण परिवर्तन घडवून आणतो.ज्याप्रमाणे परिसाचा लोखंडाला स्पर्श झाल्यावर त्याचे रूपांतर सोन्यात होते,त्याप्रमाणे ज्ञानात व्यक्त झालेला हा प्रेमानंद जीवनाच्या सर्व अंगांना ‘स्पर्श’ करतो व त्यांचे संपूर्ण रूपांतर घडवून आणतो.हा प्रेमानंद वासनेला स्पर्श करतो व तिचा कायापालट विरक्तीत होतो. त्याचप्रमाणे अहंकाराचे रूपांतर ओंकारात, बुद्धीचे परिवर्तन बोधात, चित्ताचे परिवर्तन चैतन्यात व मनाचे उन्मन होते. अंत:करणात निर्माण होणाऱ्या विकारांचे रंग सुद्धां या प्रेमानंदाच्या संगाने पालटतात. काम जातो व प्रेम निर्माण होते. क्रोध मावळतो व शांती उदयाला येते. लोभ नाहीसा होतो व वैराग्य प्रकट होते.*

*मोह आपले तोंड काळे करतो व विवेक अंत:करणान ठाण मांडतो. मद जातो व नम्रता येते आणि मत्सराचे रूपांतर आदरात होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते पण त्याचा मूळचा आकार मात्र जशाचा तस शिल्लक राहतो, त्याचप्रमाणे प्रेमानंदाच्या स्पर्शान जीवाचे ‘स्वरूप पालटते व त्याचा मनुष्यत्वाचा आकार तेवढा शिल्लक राहतो.ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे,*

 

*ते चालते ज्ञानाचे बिंब अवयव ते सुखाचे कोंब ।।*

*येर माणूसपण भांब । लौकिक भागु । ।*

*त्याचे माणूसपण हा केवळ लौकिकाचा भाग होय.वास्तविक तो दिसायला मानव पण असायला देव असतो.केवळ नामाच्या उच्चाराने ही जी अद्भुत प्राप्ती संतांना होते ती सर्वांना व्हावी ही त्यांची आर्तता;म्हणूनच ते जगाला कंठरवाने सांगतात,*

 

*विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाही ।।*

 

*आणि ज्ञानेश्वर महाराज ही विश्वाला तोच संदेश देतात,*

 

*हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।।*

 

*🙏सद्गुरु श्री वामनराव पै.🙏*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =