You are currently viewing सर्वांनी वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार करावा – मुक्ता दाभोलकर.

सर्वांनी वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार करावा – मुक्ता दाभोलकर.

वैभववाडी

मानवी जीवनाच्या वाटचालीमध्ये विज्ञानाची भूमिका महत्वाचे राहिलेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या जोरावर मानवाने आजपर्यंत प्रगती केलेली आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे तर्कशुद्ध विचारांचा स्वीकार करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या ॲड. मुक्ता दाभोळकर यांनी केले.


वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध विचार प्रशिक्षण कार्यक्रम प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी ॲड. मुक्ता दाभोळकर यांनी आभासी (ऑनलाईन) पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक प्रा.श्री.एस.एन.पाटील, आयक्युएसी समन्वयक डॉ. डी.एम. शिरसट, महाराष्ट्र विवेकवाहिनी प्रमुख प्रा.सौ.संजीवनी पाटील व महाविद्यालयातील रुसा कमिटीचे सदस्य प्रा.के.पी.पाटील उपस्थित होते.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये संविधानिक मुल्यांना धरून विद्यार्थ्यांच्या समग्र विकासावर भर दिलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे हे मूलभूत कर्तव्य भारताच्या संविधानात कलम ५१ A (h) मध्ये नमूद केलेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व तर्कशुद्ध विचार रुजविण्याचे काम महाराष्ट्र विवेकवाहिनीच्या माध्यमातून महाविद्यालयाने प्रभावीपणे करावे असे आवाहन मुक्ता दाभोळकर यांनी केले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा पोचविण्यासाठी महाराष्ट्र विवेकवाहिनी हा शासन मान्य विस्तार कार्य उपक्रम कार्यरत आहे. आपल्या महाविद्यालयात सन २००५ पासून महाराष्ट्र विवेकवहिनी हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. महाराष्ट्र विवेकवहिनी म्हणजे काय ? का आणि कशासाठी ? महाराष्ट्र विवेकवाहिनीचे स्वरूप, कार्य व सभासदत्वाचे निकष काय आहेत. तसेच शब्दप्रामाण्य व ग्रंथप्रामाण्यापेक्षा बुद्धिप्रामाण्याचा स्वीकार केला पाहिजे. म्हणजेच जेवढा पुरावा तेवढा विश्वास हा विज्ञानाचा पाया आहे. नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये या वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध विचारांचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र विवेकवहिनी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावणार आहे असे प्रमुख मार्गदर्शक प्रा. श्री.एस.एन.पाटील यांनी सांगितले.
रुसा (RUSA) अर्थात ‘राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान’ हे भारत सरकारच्या मानव संसाधन विभाग मंत्रालयाने जाहीर केलेल्या उच्च शिक्षणाच्या विस्ताराची एक समग्र योजना आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र विवेक वाहिनीच्या माध्यमातून हे धोरण राबविण्यास मदत होणार आहे.
महाविद्यालयातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र विवेकवहिनी प्रमुख प्रा.संजीवनी पाटील यांनी केले तर आभार प्रा.के.पी. पाटील यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा