You are currently viewing जागतिक महिलादिनी कामगार महिलांच्या समस्यांबाबत प्रांताधिकारी कार्यालयावर काढला भव्य मोर्चा

जागतिक महिलादिनी कामगार महिलांच्या समस्यांबाबत प्रांताधिकारी कार्यालयावर काढला भव्य मोर्चा

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार महिलांच्या समस्येबाबत सरकारचे वेधले लक्ष…!

कणकवली

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार महिलांच्या समस्यांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली कामगार महिलांनी चक्क जागतिक महिला दिनी येथील प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला . यावेळी महिला कामगारांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासह विविध घोषणांनी परिसर निनादून सोडण्यात आला.

मोर्चाचा प्रारंभ येथील पटकीदेवी मंदिर येथून करण्यात आला . तेथून आप्पासाहेब पटवर्धन चौक मार्गे महामार्गावरून मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयासमोर दाखल झाला. मोर्चादरम्यान कामगार महिलांनी ‘भारतीय मजदूर संघाचा विजय असो’ महिला कामगारांना समान काम समान वेतन, समान वागणूक मिळालीच पाहीजे, बेराजगार भत्ता मिळालाच पाहीजे, कामगार महिलांना न्याय मिळालाच पाहीजे, यासारख्या घोषणा दिल्या. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ त्वरीत कार्यान्वित करावे, असंघटीत क्षेत्रातील महिला कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान राबवावे, कामगार कल्याण बोर्डाची स्थापना करावी, कामगारांसाठी राज्य विमा योजची रुग्णालये प्रत्येक जिल्ह्यात सुरू करावी, विविध उद्योगांमध्ये स्थानिक महिला कामगारांना प्राधान्य द्यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. मोर्चामध्ये मजदूर संघाचे कोकण विभाग संघटनमंत्री हरी चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विकास गुरव, सचिव सत्यविजय जाधव, कार्याध्यक्ष भगवान साटम, कोषाध्यक्ष सुधीर ठाकूर, प्रदेश सदस्या अस्मिता तावडे, कणकवली महिला प्रमुख शुभांगी सावंत, कुडाळ महिलाप्रमुख जयश्री मडवळ, देवगड महिलाप्रमुख गीतांजली शेडगे, प्रमुख कार्यकर्त्या पल्लवी गुरव, स्वाती आंबेरकर आदी सहभागी झाले होते. मोर्चामध्ये महिला कामगारांची लक्षणिय उपस्थिती होती .

प्रतिक्रिया व्यक्त करा