You are currently viewing मौनाची भाषांतरे …

मौनाची भाषांतरे …

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

मौनाची भाषांतरे …

सिनेमा … करमणुकीचे व समाज शिक्षणाचे याच्या इतके
दुसरे माध्यम क्वचितच सापडावे.खरंच,शंभर सभा करणार
नाहीत असे काम सिनेमा तीन तासात करतो. (मी साठ ते नव्वद
च्या दशकातील सिनेमा विषयी बोलते आहे) एक चित्रपट
काय आणि किती काम करू शकतो याची अनेक उदा. हिंदी
व मराठी चित्रपटांची व नाटकांची ही देता येतील .
सिनेमातील एखादाच सीन न बोलता मौनातले सारे सांगून
टाकतो.. नि आपण थक्क होऊन फक्त बघत राहतो.

 

याचे एक उदा.फार पूर्वी येऊन गेलेला “ अनुपमा” हा सिनेमा.
सिनेमा हा विषय कुणालाही वर्ज्य असण्याचे कारण नाही असे
माझे मत आहे. कारण वाढणाऱ्याने समोर काही ही वाढले तरी
काय खायचे व काय नाही हे शेवटी आपण ठरवू शकतो . ते
पूर्णपणे आपल्या हातात असते.म्हणून सिनेमातून काय घ्यायचे
हे नक्कीच आपण ठरवू शकतो.
हं .. मी “अनुपमा “विषयी बोलत आहे .सर्वांगसुंदर असा हा चित्रपट मनावर कायमची छाप ठेवून जातो याचे कारण त्यातील अबोल नायिका …(मुकी नव्हे) अहो ती तोंडाने बोलतच नाही ..
“ तर ती बोलते मौनातून .. या तिच्या मौनाचे भाषांतर मात्र
आपल्याला करता आले पाहिजे इतके सुंदर तिचे मौन आहे.

 

अहो , ती फोनवर सुद्धा मानच हलवते, बोलत नाहीच पण
पलीकडून बोलणाऱ्या तिच्या सुहृदांना ती फोनवर मान हलवते
आहे हे कळते लक्षात येते की तिची ही मौनाची भाषा सगळ्यांनाच कळते आहे नि आपल्याला खुदकन् हसू येते.
धर्मेंद्र आणि शर्मिला टागोर यांच्या अभिनया विषयी काय बोलावे… केवळ लाजवाब …एवढेच म्हणू शकतो.
आईविना बापाजवळ वाढणारी, बापाच्या रागाला कारणीभूत
ठरणारी ही अश्राप पोर …फक्त डोळ्यांनी बोलणारी, फारतर मान हलवणारी गुलाबाची नुकतीच उमलणारी नाजुक कळी!

 

एक अतिशय हृद्य प्रसंग व गाणे यात आहे.दूर वर पसरलेल्या
फुलांच्या रानात , जंगलात ती एका प्रसन्न सकाळी एकटीच
फिरत सृष्टीशोभा पहात गाणे म्हणत असते..

.. कुछ दिलने कहॅां …. कुछ भी नहीं…
कुछ दिलने सुना ..ऽऽऽऽऽ.. कुछ भी नहीं…
ऐसी भी बाते होती है .. कुछ ऐसी भी बाते होती है…

अतिशय प्रसन्न वातावरण .. सृष्टीत सर्वत्र मौन आहे.. पान ही
हलत नाही .. सर्वत्र फुले फुलली आहेत . आणि अशात लताची सुरेल लकेर कानावर पडते …
कुछ दिल ने कहॅां ….

वाह वा … कोवळी कळी शर्मिला…लताचा मधुर आवाज..
मौनाचा भंग न होता ते अनुपम सौंदर्य बघत बघत आपण ही
त्या मौनात जणू चार पाच मिनिटे हरवून जातो.. अननुभूत अशा
आनंदात .. मौनाच्या पार्श्वभूमीवर इतके लाजवाब हे दृष्य आहे की, मौनाचा खरा अर्थ आपल्याला कळावा. मौनालाही भाषा
असते नि ती नजरेने टिपायची व हृदयात साठवायची असते
हे दिग्दर्शकाचे कौशल्य पाहून आपण स्तब्ध व थक्क होऊन
जातो. हिंदी सिनेमाचे काही दिग्दर्शक अतिशय प्रतिभावान ,
प्रतिभा संपन्न …
आहेत.आपल्याला हे मान्य करावे लागेल.

 

फुले वेचित शर्मिला हळूवार पाऊले टाकत येते.. ओंजळीत
फुले गोळा करीत आपल्याच नादात ती गुणगुणत असते…
ऐसी भी बाते होती है .. कुछ ऐसी भी बाते होती है…
गाणे ही त्या मौनाला पुरक असेच आहे. धर्मेंद्र येतो नि न बोलता ती फुलांची ओंजळ त्याच्या ओंजळीत रिकामी करते.
दोघांचाही अभिनय लाजवाब. पूर्ण सिनेमात ती दोनचार
वाक्ये सुद्धा बोलत नाही तरी तिची मौनाची भाषा मात्र सर्व
कुटुंबियांच्या हृदयापर्यंत पोहोचते, केवढे कसब आहे, दिग्दर्शकाचे … मौनाचे भाषांतर करण्याचे ….!

 

पूर्ण सिनेमा तिने मौनाने खाऊन टाकला आहे इतकी ती मौनाची भाषा सुंदर आहे.मंडळी पहाटे आपण उठतो…
सारी सृष्टी आरसपानी नि सुंदर असते..चराचर स्तब्ध असते
नि आपल्याला ही मौनाचीच भाषा तेव्हा हवी असते.आपल्यालाही कुणाशी बोलायचे नसते नि मग ह्या
मुग्ध रूपाकडे आपण अनिमिष नेत्रांनी बघत राहतो.मूक पणे
आपण मनाशी संवाद करत असतो. त्याला शब्दांची गरज
नसतेच मुळी.हा संवाद मनाचा मनाशी … अत्र्यांनी म्हटल्या
प्रमाणे.त्या…तरू तळी एक पथारी नि चोपडी एक हाताशी ..बस्स,…….
बाकी काही नको !

 

माणसाच्या बोलण्यातूनच सारे कळते असे काही नाही.न बोलताही आपला चेहरा बरेच काही सांगून जातो हे ही तितकेच खरे आहे.एखाद्या चांदण्या रात्री आपण वर गच्चीवर
गेलो असता झाडे चंद्र नि आपण एकटे असतो .. बोलायची
गरजच नसते. पण आपण एकमेकांशी संवादच करत नसतो
काय? मूक पणे…
पिंजरा सिनेमात ह्या मौनाचे एक उत्तम उदा.द्यायचे झाल्यास
एक प्रसंग मला आठवला… पंगतीत जेवतांना डॅा.श्रीराम लागू
बसतात त्यांच्या शेजारी कुत्रा ही जेवत असतो. हा एकच प्रसंग
एक बाई इरेला पेटली तर काय अवस्था करुन सोडते माणसाची… हे न बोलता केवळ एक मूक दृष्य हजार वाक्यांचे
काम करून जाते …मौनात केवढे सामर्थ्य आहे पहा …हे मौनाचे भाषांतरच नव्हे काय …?

 

घरातही खूप वेळा आपण हा मौनाचा प्रयोग करतो.कधी
दहा दिवस विपश्यनेला जाऊन मौन राहून आपल्या अंतरंगात
डोकावून पाहतो.. अंतर्मुख होऊन मनाची शुद्धी साधू पाहतो.आता कोणाचा मनावर किती ताबा आहे, हे त्याचे
तोच जाणे… तशी मन ही सहजा सहजी ताब्यात येणारी गोष्ट
नाहीच.. हे,जग जाहीर आहे. तरी बापुडे प्रयत्न करतच असतात. मौनात सुद्धा किती काहूर असते मनात ..? सुसाट
वेगाने विचार धावतच असतात ना..? तरी मौनाची भाषांतरे
होतच असतात ठिकठिकाणी …
म्हणतात ना “ मौनं सर्वार्थ साधनंम् ….”

धन्यवाद …

हो .. ही फक्त माझी मते आहेत …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २३ फेब्रुवारी २०२२
वेळ : दुपारी ३ : ०४

प्रतिक्रिया व्यक्त करा