You are currently viewing पाऊस दाटलेला

पाऊस दाटलेला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा अप्रतिम ललीतलेख*

*पाऊस दाटलेला*

*मखमली मन पंखांवर*
*थुई थुई नाचे मनमोर*
*दाटुनी येता पाऊस*
*मन मोहवी चित्तचोर*

निरभ्र स्वच्छ निळे आभाळ…वाऱ्याच्या वेगाने धावणारे कापसासारखे पिंजलेले शुभ्रधवल स्वच्छंदी ढग अवकाशी सैर करतात…किलबिलाट करणारा पक्षांचा आनंदी थवा… मोठ्या दिमाखात आभाळाला हात लावण्या उंच उडतो… सूर्याची प्रखर पण तेजस्वी किरणे पांढऱ्या शुभ्र ढगांमधून डोकावतात… जणू हिरे मोती आपले तेज सांडुनी रिक्तहस्ते तो अवर्णनीय तेजोमय नजारा पाहत असतात…तेजाची उधळण होते…अगदी जसे स्वच्छंदी मनावर सुखाची, आनंदाची, सौख्याची तेजस्वी किरणे पडतात आणि आनंदभरे मन त्या किरणांच्या तेजाने सुखावते…मोहरून, बहरून जाते… मनाच्या मनपंखांवर मनमोर थुई थुई नृत्य करतो… नृत्याच्या तालावर मनपिसारा फुलतो… बेधुंद नृत्याने मनावर सुखाचा पाऊस दाटून येतो… एकीकडे सुखाच्या सरींनी मन चिंब चिंब भिजून जाते….
….पण मनावर दाटलेल्या… काळ्याकुट्ट विचारांच्या ढगांनी आच्छादलेल्या… तप्त विचारांच्या झळांनी मनाची काहिली काहिली करून… भीतीच्या…अविश्वासाच्या घामाच्या धारांनी अंग अंग भिजवून तडफडवणाऱ्या पावसाचं करायचं तरी काय?

*पाऊस दाटलेल्या*
*मनास भास तुझा*
*काहुर माजलेल्या*
*क्षणास ध्यास तुझा*

पाऊस दाटलेल्या मनास तुझी आस होती ..तू येशील अन् तुझ्या कुंतलांतून टपकणाऱ्या हिरेजडित जलबिंदूंचे तुषार माझ्या व्याकुळ अधरांवर सांडशील…त्या चंदेरी जलबिंदूंनी…तृप्त होतील माझ्या माझ्या अधर पाकळ्यां… एक ना अनेक विचारांनी मनावर ढगाळ वातावरण केलं होतं… सोसाट्याचा वारा सुटला होता… तुझ्या स्वैर वागण्याने डोक्यातील विचार एकमेकांवर असे काय आदळत होते…जणू ढगांवर ढग आदळून विजांचा कडकडाट व्हावा अन् काळजाला भेदून जाणारी वीज कोसळावी सर्वांगावर…संपूर्ण देह त्या विजेच्या लोळाने पेटून उठावा…ढगांचा गडगडाट…विजांचा थयथयाट… अन् धगधगलेल्या अंगावर पावसाचा टपोरा थेंब कोसळावा… मातीचा सुगंध रंध्रारंध्रात भिनावा… माझ्या मनाच्या दारावर तुझ्या हळुवार पावलांचा भास व्हावा…कोमल तुझ्या तळव्यांना …भिजवून थेंब जावा…
मनावर दाटलेला पाऊस सर्वांगावर कोसळावा…तिने चोरून त्याच्याकडे एक प्रेम कटाक्ष टाकावा…मनसोक्त कोसळणारा पाऊस त्याच्यासाठी आनंदाचा खजिना भासावा…उत्साह, हर्षाने उर भरावा…वेड्यावत स्वप्नातून तो जागा व्हावा… अन्…उराशी कवटाळलेल्या स्वप्नांना त्याच्या मनातल्या चिखलात तुडवताना पहावं… तिची वाट पाहता पाहता…तिने नजरेसमोर यावं… त्याच्या कडे न पाहताच…नजर चोरून निघून जावं… त्याच्या भावनांचा… पालापाचोळा व्हावा अन् मनातल्या विचारांच्या पुरात वाहून जावा तशा… भावना डोळ्यातील आसवांचा पुरात वाहून गेल्या….
चिंब भिजताना पावसात आसवांनी आसवांना न ओळख दाखवावी… गालांवरून थेंब होऊन आसवे गालांशी परकी व्हावी… तशीच गालावर ओघळणारी आसवं सुद्धा त्याला परकी झाली…!
अंगावर धो धो कोसळणाऱ्या पावसापेक्षा त्याच्या मनावर कोसळणारा पाऊस बेधुंद कोसळत होता…आता तर त्याला त्याच्या अंगावर कोसळणारा…कधीकाळी हवाहवासा वाटणारा…प्रेमाचं गीत गाणारा…तिच्या आणि त्याच्या प्रेमात रममाण असणारा पाऊस सुद्धा नकोसा वाटू लागलेला…त्याच्या मनावर दाटलेले ढग सुद्धा निराशेची बरसात करत होते… पावसाच्या संगतीने पाहिलेली ती स्वप्नं… तिच्या सोबत अंगावर झेललेल्या जलधारा सारं काही फसवं वाटू लागलं…मनावर दाटलेल्या पावसाने त्याची स्वप्ने बेचिराख झाली…जणू आयुष्याचा विध्वंस झाला… बेवफाईच्या पुरात सारं काही वाहून गेलं अन् वटवृक्षासारखं वाटणारं त्याच खंबीर मन कोसळून पडलं…स्वप्नांच्या चिखलात…!
मनात दाटलेल्या पावसाने बेजार होऊन तो निराशेच्या गर्तेत अडकून पडतो….पावसाचा आता त्याला तिरस्कार वाटू लागतो… मन जिवंतपणाच्या दुनियेतून त्याला दूर घेऊन जाते… तिथेही त्याच्या समोर येतात…. तिच्या सोबत पावसात भिजलेले ते क्षण…तिच्या रेशमी कुंतलातून टपकणारे मोती… तिच्या अधरांवर त्याच्या अधारांनी अलगद पिलेले ते जलबिंदूं… अन्…तिने त्याच्या नजरेलाही नजर न देता…तिने केलेली अवहेलना…त्याच्या प्रेमाचा झालेला घात… त्याचा उर तिच्या आठवांनी भरून येतो…त्याच्या मनातला पाऊस पुन्हा एकदा गडद अंधार करून दाटून येतो…कधीही न कोसळण्यासाठी….!

©[दीपि]
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 1 =