You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश

*एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे पेच*

 

कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्या त्या परिसरातील पायाभूत सुविधा पाहून महाविद्यालय सुरू करणे असेही त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. गेली दोन वर्षे सुरु असलेला कोरोना अलीकडच्या काही दिवसात बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बहुतांश ग्रामीण व डोंगरी भाग असल्याने महाविद्यालयात शिकणारी बरीचशी मुले ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यातील शहरी भागातील पालकांची बरीचशी मुले बारावीनंतर वेगवेगळ्या ठिकाणी कोर्सेससाठी जातात व मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील मुले आपल्या घरच्या परिस्थितीनुसार महाविद्यालयातील उच्च शिक्षण घेत असतात. गेले चार महिने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस बंद असून कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे ग्रामीण भागातून शहराकडे येण्याच्या सुविधा या बंदच आहेत. काही ठिकाणाहून सहासीटर रिक्षा आदी साधनाने शालेय व महाविद्यालयीन मुले महाविद्यालयामध्ये येत असतात. परंतु जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये सहासीटर रिक्षांची सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील महाविद्यालये जरी सुरू केली तरी महाविद्यालयांमध्ये उपस्थिती बऱ्याच प्रमाणात कमी असणार, त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने गेली दोन वर्षे शिक्षण सुरू आहे, परंतु महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने शिकवण्याचे बंद होणार व ऑफलाइन पद्धतीने सुरू होणाऱ्या वर्गांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना देता येणार नाही. देवगड येथील एका महाविद्यालयाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वरून आदेश असल्याने ऑनलाइन पद्धतीने महाविद्यालयीन शिक्षण सुरू केल्याचे सांगून महाविद्यालयात उपस्थित रहाणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यामुळे मुलांसमोर महाविद्यालयात येण्यासाठी प्रवास कसा करायचा हा पेच निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागातील मुलांना शहरात भाड्याची खोली घेऊन अथवा इतर काही शक्य असतील त्या सुविधा घेत महाविद्यालयात उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना काळात कामधंदे, उद्योग, व्यवसाय बंद पडले तसेच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यामुळे कित्येक लोक बेरोजगार होऊन घरी बसले, आणि त्यांच्या पुढे जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. अशावेळी आपले कुटुंब सांभाळताना कसरत करावी लागत आहे, त्यातच महाविद्यालय प्रशासनाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शहरात खोलीत घेऊन राहण्याचे सांगून महाविद्यालयात उपस्थिती दर्शविण्याचे सांगितल्याने मुलांवर व पालकांवर दडपण आले आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना शहरात खोली घेऊन राहणे मुश्कील होणार असून जिल्हा प्रशासनाने तसेच त्या त्या परिसरातील महाविद्यालयीन प्रशासनाने याबाबत विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील ग्रामीण लोकांचा आणि विद्यार्थ्यांचा विचार करता याबाबत योग्य तो विचार व्हावा व एसटी सुवीधा सुरू होईपर्यंत ऑनलाईन अभ्यास घ्यावा अशी मागणी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा