You are currently viewing कात्रजचा घाट दाखवता दाखवता गाडी येऊन अडकली आंबोली घाटात..

कात्रजचा घाट दाखवता दाखवता गाडी येऊन अडकली आंबोली घाटात..

विशेष संपादकीय….

दीपक केसरकर यांचा नगराध्यक्ष ते राज्यमंत्री हा प्रवास सहज सोपा नव्हता. स्वीकृत नगरसेवक म्हणून सावंतवाडी नगरपलिकेत प्रवेश केलेले दीपकभाई यांची महत्त्वाकांक्षा दांडगी होती. राजकारणाच्या सुरुवातीस नारायण राणे यांचा कधी शिडी म्हणून वापर करत तर कधी दादा म्हणत वापर करून घेत टाळ मृदंग वाजवून हळूहळू एक एक पायरी वर चढत गेले.
केसरकर यांच्याकडे अफाट बुद्धिमत्ता आहे. त्यामुळे राजकीय डावपेच आखण्यात ते तरबेज आहेत. नारायण राणे यांच्या मदतीने नगराध्यक्ष झालेले केसरकर यांनी नारायण राणे यांच्याच दहशतवादाचा डंका वाजवत महाराष्ट्रात स्वतःची ओळख निर्माण केली. आपल्या धूर्त राजकारणाने त्यांनी नारायण राणे यांचा उधळता वारू रोखून धरला. परंतु राष्ट्रवादी पक्ष सोडताना राष्ट्रवादीच्या जाणता राजाची जोशात येत केलेली अवहेलना नडली आणि तिथेच आज घोडं अडलं.
ज्या व्यक्तीने आपली हयात राजकारणात घालवली, अनेक नेते, कार्यकर्ते घडविले, त्यांनाच कात्रजचा घाट दाखविण्याची केलेली भाषाच भारी पडली. ज्याने कित्येक घाट जवळून पाहिले, सर केले त्यांनाच कात्रजचा घाट दाखविणे ही आज चूक ठरली आणि मागील मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करूनही आघाडी सरकारमध्ये पद न मिळाल्याने ती चूक सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही भोवली असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
युती करून लढलेली विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री पदावर येऊन अडकली आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अनपेक्षित अशी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडी उदयास आली. सेना नेतृत्वाचे लाडके समजले जाणारे मात्र या आघाडीच्या वादळात पत्त्यांच्या बंगल्यासारखे उडून गेले. चांदा ते बांदा ही केसरकरांची महत्त्वाकांक्षी योजना थांबविण्यात आली. अजित पवार यांनी या योजनेकडे साफ दुर्लक्ष केलं. चांदा ते बांदा गुंडाळली गेली आणि मंत्रिपद सुद्धा गेले.
बदलत्या राजकीय परिस्थितीत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेत आली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे खुर्चीत बसले परंतु राष्ट्रवादीला खिळखिळी करून बाहेर पडलेले दीपक केसरकर, भास्कर जाधव, सचिन अहिर यांना मात्र मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यांना अलिप्तच ठेवण्यात आले. त्यामुळे आजची परिस्थिती ही न बोलून ।।। मार अशीच झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच सावंतवाडी शहरासाठी येणारा निधीही कमी झाला.
राजकारणात घडलेल्या या घडामोडी पाहता कात्रज मार्गे मंत्रालयात जाणारी गाडी आंबोली घाटातच अडकून पडल्याची दिसून येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + five =