You are currently viewing सूर तेच छेडिता

सूर तेच छेडिता

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा ललितलेख

*सूर तेच छेडिता*
*गीत झंकारले मनी*
*आठवणी छळतील*
*त्या जुन्या क्षणोक्षणी*

मनाच्या एका कोपऱ्यात दडलेल्या असतात काही आठवणी…आठवायच्या तर त्या नसतात…सोनेरी दिवसांनी आयुष्याची केलेली ती एक सुरूवात होती…सोनेरी किरणांनी सोन्यासारख्या तेजस्वी आपला रंग झाडावर सांडावा अन त्या सोनेरी तेजाने झाडाने मोहरून, बहरून जावे…. सोन्याचे तेज लेवून सोनेरी होऊन त्या किरणांत मिसळावे….आणि आपलं स्वत्व किरणांच्या हवाली करावं ….तसेच होते ते सोनेरी दिवस … माझं अस्तित्व मी कधीच तुझ्यात मिसळून टाकलं होतं…तुझा आनंद हाच जणू माझा आनंद होता…तुझ्या डोळ्यात मी माझं सुख शोधायचो…तुझ्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव…माझ्या चेहरा खुलवित होते..गालावरची खळी मला आकर्षित करायची…जसा भुंगा आकर्षून जायचा फुलांच्या मोहक सुगंधाकडे तशीच….तुझ्या अधर पाकळ्या मोहून टाकायच्या….आसक्त व्हायचो मी फुलपाखरा सारखाच….पाकळीवर बसून पुंकेसरातून मध शोषण्यासाठी…
तुझा रंग ….गंध…..अन तुझा सहवास…परमानंद द्यायचा….सुखाची अनुभूती लाभायची…..तुझा नाजूक हात हाती घेऊनी तासनतास सुख लुटायचो…तुझ्या नाजूक स्पर्शाचे….तुझा सहवास हवाहवासा वाटायचा….अगदी बकुळीच्या फुलासारखाच…माझं आयुष्य सदोदित गंधित करणारा…

बकुळीचे फुल तुझ्यासारखंच असतं… गव्हाळ रंगाचं… रूप गर्विष्ठ नसतंच ते….खूपच छोटा परीघ त्याचा तुझ्यासारखाच माझ्या भोवतीच संपणारा…दुरून पाहून कुणालाच आकर्षण वाटत नाही…पण एकदा का खिशात, पुस्तकात….सहवासात ठेवलं की सुकल्यावरही सुगंध देत….आयुष्यभर….निष्ठावान असल्यासारखं.
तुझंही तसंच….
बकुळीच्या फुलासारखं…सुख असो वा दुःख…समोरच्याला जाणवूही न देता आनंद देत राहतेस…कायमच.

*अबोल प्रित बहरली*
*कळी हळूच उमलली*
*वेदना सुखावली*
*हासली तुझ्यासवे*

न बोलताच तू साथ दिलेलीस मला…जाणीवही नव्हती तुला माझ्या प्रेमाची…मी मात्र मनोमन तुझ्यावर प्रेम करायचो…वाट पहायचो… कधीतरी तू बोलशील ….मनातले सारे काही माझ्या मनाला सांगशील…मी तुझं मन समजूनही…. न समजल्यासारखाच राहिलो….तुझी दुःख तुझ्या वेदना मी शोधण्याचा प्रयत्न केला…पण तुझं माझ्यावर असणारं प्रेम मात्र मला ना तुझ्या डोळ्यात दिसलं…ना शब्दातून समजलं…तू ते मला कधी जाणवूही दिलं नाहीस…मी मात्र कधीतरी तुझे डोळे बोलतील….म्हणून डोळ्यात डोळे घालून बसायचो….नजर चोरून तुझे डोळेही फसवायचे माझ्या डोळ्यांना…आपल्या मागून मागून फिरवायचे…
पण ती पौर्णिमेची सांज आली…..रवी आपलं तांबडे भडक रूप घेऊन सागरात लुप्त होत होता….आकाशात तांबडं फुटलं होतं…त्या तांबड्या रंगाची छटा सागराच्या पाण्यावर पसरून लहरींवर खेळत होती…पाण्यावर मस्त तरंग उठत होते…डोळ्यांनी दिसणारं सुष्टीचं ते अवर्णनीय दृश्य डोळे दिपवून टाकत होतं…तुझा माझ्या हाती असलेला हात वाऱ्यावर शहारे येऊन कंप पावत होता…मावळत्या सूर्याच्या साक्षीने मी तिथेच तुझी आयुष्यभराची सोबत मागितली अन….
तू हसत….लाजत….माझ्या प्रस्तावाला मानेनेच होकार दिलास….
अबोल तुझी प्रित बोलली….ओठांची कळी आपसूकच फुलली…अन…कधी तू माझ्या मिठीत शिरलीस ते देखील समजलंच नाही. सूर्य अस्ताला जात होता…पौर्णिमेचा मोहक चंद्रमा…हासत हासतच आला…तुला बाहुत शिरलेलं पाहूनी तोही लाजला असेल…

*एकटा तरीही स्मृती तुझ्याच या सभोवती*
*बोललो कसे किती शब्द शब्द आठवे*

तुझ्याविना आज एकटाच असताना आठवतात त्या गत स्मृती…तुझ्याच भोवती फिरणाऱ्या…तुझ्याच भोवती संपणाऱ्या…तू सोबत असताना मीच बोलत असायचो…शब्द शब्द बोलून शब्दांची माळ घालत बसायचो…कसे..,नि किती बोललो…आज ते शब्द शब्द आठवतात….अन डोळ्यांच्या कडा पुन्हा पुन्हा ओलावतात…
*सूर तेची छेडिता….बोल आठवले जुने….*
*तुझ्याच सवे सखे कधी…मी उधळले होते आसमंती सोने..*

©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा