You are currently viewing हृषीकेषा..

हृषीकेषा..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची श्रीकृष्णाच्या विविध नामांनी रंगलेली काव्यरचना*

 

प्रहर कोणताही असुदे गोविंदा गोपाला
तुझे नाम ओठी येता विसरतो स्वतः ला

सूर बांसुरीचा येता पहाटेस मंद धुंद
आठवतो मुरलीधर मन मोहन मुकुंद

जागविती स्वप्नामधूनी कधी मधुर बोल
पायींची रुणझुण भासे कां येई नन्दलाल

गोठ्यातुन देतात वासरे साद हंबरून
दुडदुड तो धावत जाई वाटे यदुनंदन

कधी हांक दारीं प्रभाती देई वासुदेव
काळ तो निराळा तरी काळजात ठाव

कथा नारदाच्या सांगून आई म्हणे झोप
शब्द नारायण नारायण मुखी आपोआप

दिवस संपता खेळून येई दाटून अंधार
समईच्या ज्योतीने उजळे ती शाम सुंदर

असेल कां कृष्ण सखाही असा घनश्याम
जरी कुणी घेईल श्रीधर वा जनार्दन नाम

रासलीला असे कैसी प्रश्न मनी सदा उभा
भेटता विचारीन तुज मी गोपिका वल्लभा

ऐक सांगतो तुजला रे सख्या हृषीकेषा
स्वप्नातही आवडते आम्हा तुझी वेशभूषा

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + five =