घरातच झाला दुर्दैवी अंत; बाथरूममध्ये मृतदेह सापडला
सावंतवाडी
माजगाव येथील श्री चंद्रकांत सिताराम वाडकर (वय ८५) यांचा मृतदेह आज सकाळी त्यांच्या घरातील बाथरूममध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या मुलगा गौरव चंद्रकांत वाडकर (वय ३२, रा. इन्सुली क्षेत्रफळवाडी) यांना फोन करून “मासे घेऊन घरी येतो” असे सांगितले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत.
आज (दि. ३ मे) सकाळी मुलगा गौरव वाडकर हे वडिलांची विचारपूस करण्यासाठी घरी आले असता, घराच्या दरवाज्याची कडी आतून बंद असल्याचे दिसून आले. तसेच घरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी आत पाहणी केली असता, वडील बाथरूममध्ये मृत अवस्थेत आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार अनिल धुरी करत आहेत.
