वडिलांच्या गाडीखाली चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; देवगड तालुका हादरला
तळवडे-परबवाडीतील हृदयद्रावक घटना; चार वर्षीय रूंजी परबचा जागीच अंत
देवगड
वडील चालवत असलेल्या बोलेरो पिकअपच्या चाकाखाली सापडून चार वर्षीय रूंजी हरेश परब हिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना देवगड तालुक्यातील तळवडे-परबवाडी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून परब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरेश परब यांनी कामासाठी भाड्याने आणलेली बोलेरो पिकअप गाडी परत करण्यासाठी घराबाहेर पडताना त्यांची मुलगी रूंजी ही गाडीत क्लीनर सीटवर बसली होती. काही वेळाने तिने खाली उतरण्याचा हट्ट केल्याने वडिलांनी तिला उतरवून घरी जाण्यास सांगितले. मात्र, ती सुरक्षितपणे दूर गेली असावी, असा समज करून गाडी पुढे घेत असताना दुर्दैवाने मागील चाकाखाली येऊन तिचा गंभीर अपघात झाला.
या अपघातात रूंजीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. तातडीने तिला देवगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. एका क्षणाच्या अनावधानाने निष्पाप जीव गमावल्याने संपूर्ण तालुका शोकमग्न झाला आहे.
