You are currently viewing कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा – डॉ. अनिषा दळवी

कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा – डॉ. अनिषा दळवी

नेटवर्क समस्येमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित…

दोडामार्ग

कोरोना आणि ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर अचानक शाळा बंद झाल्यामुळे नेटवर्क सुविधे अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शासनाने कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती अनिषा दळवी यांनी केली आहे. दरम्यान याबाबतची मागणी शिक्षक संघटना, शालेय व्यवस्थापन समित्या आणि पालक यांच्याकडून सुद्धा होत आहे. त्यामुळे यासंदर्भात राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. याबाबत सौ. दळवी यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, राज्यात आणि देशात ओमायक्रोन आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे गेले तीन महिने सुरू असलेली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा अचानक बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि ऑनलाइन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, असे आदेश दिले होते. परंतु ग्रामीण भागात नेट कनेक्टिव्हीटी नसल्यामुळे व अन्य गरीब विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्यामुळे बरेच विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून वंचित राहू लागले आहेत. जिल्ह्यातील अनेक गावात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत एकही रुग्ण न सापडलेले, अशा बऱ्याच गावांमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु करणे शक्य असून गेल्या काही दिवसापासून शिक्षक संघटना आणि आता ग्राम शालेय व्यवस्थापन समित्या यांच्यामार्फत ग्रामीण भागातील शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी पालक वर्गातूनही वाढू लागली आहे. त्यामुळे याकडे राज्य शासनाने सकारात्मक भूमिकेतून बघून शाळा सुरु करण्या संदर्भातील पुढील निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + three =