You are currently viewing नितेश राणे यांचे विश्वासू असलेले सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

नितेश राणे यांचे विश्वासू असलेले सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

सावंतवाडी विधानसभा उमेदवार म्हणून नवा चेहरा

विधानसभेच्या निवडणुका आल्या की अनेकांना आमदारकीची स्वप्ने पडतात. काहीजण पक्षातर्फे तर काहीजण प्रत्येक विधानसभेला अपक्ष उमेदवारी भरतात. आमदारकीचा पडेल उमेदवार म्हणूनही अगदी कॉलर ताठ करून मिरवतात. सावंतवाडी मतदारसंघात देखील असे काही पडेल उमेदवार आहेत. परंतु “”काटे की टक्कर” ज्यांच्यात होते ते मात्र दीर्घकाळ स्मरणात राहतात… वर्षानुवर्षे निवडणुका आल्या की त्यांची नावे चर्चेत असतात. मागील तीन विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघातून माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी अनुक्रमे राष्ट्रवादी व शिवसेनेकडून निवडून येत हॅट्रिक साधली होती. त्यामुळे पुढील निवडणुकीत जर सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर भाजपा कडून विरोधात कोण उमेदवार असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मागील विधानसभा निवडणुकीपासून सावंतवाडीतून इच्छुक असलेले भाजपाचे जिल्हा प्रवक्ते सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी विधानसभा लढविणार असे वारंवार सांगितले आहे. सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत दीपक केसरकर यांची २३ वर्षे अबाधित असलेली सत्ता उलथवून टाकून केसरकरांना घरच्या मैदानात धोबीपछाड दिल्याने संजू परब यांचे नाव चर्चेत आहे. संजू परब हे माजी खासदार निलेश राणे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. अनेकदा माजी खासदार निलेश राणे यांनी सावंतवाडीतील आपल्या भाषणात संजू परब यांचा उल्लेख भाऊ म्हणून केला आहे. संजू परब यांनी देखील खाजगीत बोलताना बऱ्याचदा निलेश राणे यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे कबूल केले आहे. मागच्या सावंतवाडी नगरपालिका पोटनिवडणुकीत नितेश राणे यांनी नगरपालिकेची जबाबदारी घेत संजू परब यांना निवडून आणले होते. परंतु त्यानंतर नितेश राणे हे सावंतवाडी नगरपालिकेत अपवादानेच आले. माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व संजू परब यांच्या मध्ये त्यावेळी जास्त जवळीक झालेली दिसून येत होती.
अलीकडेच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत नितेश राणे यांच्या अत्यंत जवळचे, विश्वासू मानले जाणारे व कणकवली हल्ला प्रकरणी नितेश राणेंसोबत आरोप असलेले मनीष दळवी हे निवडून येत जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान देखील झाले. पूर्वाश्रमीचे भाजपा व संघाचे कार्यकर्ते असलेले अतुल काळसेकर अध्यक्ष होतील अशी अटकळ बांधलेली असतानाही नितेश राणेंचे कट्टर समर्थक मनीष दळवी बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हल्ला प्रकरणी अटकपूर्व जामीन न मिळाल्याने निवडणूक पूर्व चार दिवस भूमिगत असताना देखील आपले पूर्वीचे गुरू विलास गावडे यांना पराभूत करणारे मनीष दळवी भविष्यात सावंतवाडी विधानसभेसाठी भाजपाचा उमेदवार म्हणून नवा चेहरा पुढे आल्यास आश्चर्य वाटू नये.
कसलाही गाजावाजा न करता, अवास्तव न बोलता अत्यंत संयमाने निवडणुका कशा जिंकायच्या हे मनीष दळवी यांनी बँकेच्या निवडणुकीतून दाखवून दिले आहे. विलास गावडे यांच्याच पठडीत तयार झालेले आणि नितेश राणेंसारख्या तरुण तडफदार नेत्यांची साथ असलेले मनीष दळवी हा भाजपाचा नवा तरुण चेहरा आहे. वेंगुर्ला तालुक्यात मनीष दळवी यांचे पूर्वीपासून अत्यंत चांगले राजकीय संबंध आहेत. सर्वच पक्षांमध्ये मित्रमंडळी आहेत, तसेच नितेश राणेंचे जवळचे आणि विश्वासू साथीदार आहेत त्यामुळे मनीष दळवी यांच्यासाठी भावी विधानसभेची उमेदवारी मिळविणे देखील सहज शक्य आहे. आमदार नितेश राणे यांच्यावर राज्याच्या भाजपा नेतृत्वाचा असलेला विश्वास ही मनीष दळवी यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात भाजपाचा उमेदवार कोण? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 14 =