You are currently viewing सारे काही जगण्यासाठी.
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

सारे काही जगण्यासाठी.

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या सावित्रीची लेक, आदर्श शिक्षिका, नेशन बिल्डर अवॉर्ड प्राप्त, विविध वृत्तपत्रातून लिखाण करणाऱ्या लेखिका, कवयित्री सौ सुजाता पुरी यांचा लेख.

*आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडे*
*आपलं काही तरी मागणं आहे*
*आपल्याला काही हवं असणं*
*म्हणजेच आपल जगणं आहे.*

जीवन जगत असताना आपण कितीतरी गोष्टींची मागणी करत असतो. पण या सर्व गोष्टीत जीवन हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जी आपल्या जवळ असते. जगण्याची तीव्र इच्छा कुणाला नसते ? फक्त मनुष्य प्राण्यालाच नव्हे तर पशु पक्षी, अगदी किडे, मुंग्या यांना ही ती असते.
डिस्कवरी, एनिमल प्लानेट अशा टी वी चॅनलवर जगभरातल्या असंख्य सजीवांची जगण्यासाठी आणि आपल्या पिलांना जगविण्यासाठी चालणारी विलक्षण धडपड पाहायला मिळते, ती पाहून मन थक्क होते.
बॉम्बस्फोटात होरपळलेली, अपघातात जखमी झालेली, जीवघेण्या आजाराने बेजार झालेली माणसं ही जगण्यासाठी धडपडत असतात.
यासंदर्भात वृत्तपत्रात एक बातमी वाचली होती. ती सांगाविशी वाटते . झालं असं कि एक विमान कुठल्याशा दुर्गम बर्फाळ प्रदेशात कोसळलं होतं ,कित्येक दिवस त्याचा शोध लागला नव्हता.त्या विमानातील प्रवाशांपर्यंत कसलीही मदत पोहोचू शकली नव्हती. बरेचसे प्रवासी मृत झाले होते. मात्र जे काही थोडे वाचले होते, त्यांनी जेव्हा खाण्यासाठी काही ही उरलं नाही तेव्हा, मृत सहप्रवाशांचं मांस खाऊन स्वतःला जगवलं होतं. जन्माला येणाऱ्या प्रत्येकालाच अखेरच्या क्षणापर्यंत जगण्याचा सोस असतो.चाललेली सगळी धडपड ही फक्त जिवंत राहण्यासाठी असते असे म्हंटले तर योग्य होईल.
स्वतःला संपवण्याचे विविध मार्ग ही माणसाने शोधून काढले आहेत. काही जण गुटखा खाऊन मरतात.
काही जण खोपडी पिऊन मरतात.काही जण कुणाच्या प्रेमात पडून झुरून झुरून मरतात.
अमेरिकन लेखिका आयन रँड म्हणते त्याप्रमाणे स्वतःला विनाशाकडे नेण्याचा विशेषाधिकार वापरणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे.
प्राणी जगायचं म्हणून जगतात. का जगायचं? हा प्रश्न त्यांना पडत नाही, माणसाला तो पडतो. म्हणूनच तो कायमच अस्वस्थ असतो.
या अस्वस्थतेतूनच माणूस स्वतःच्या जगण्याला अर्थ देण्याचा प्रयत्न करतो. त्याचं हे फक्त जगणं असतं. सतत प्रगती करणं हेच माणसाचं खरं जगणं असतं.
पण प्रगती कशात करावी हे ही ज्याला त्याला योग्य वेळी समजायला हवं.

*मी देता मुक्तहस्ताने*
*किती घेशील दो कराने*

असं जेव्हा निसर्ग आपल्याला सांगत असतो तेव्हा आपणही त्याचं सांगाती व्हायचं असतं. पण आपण त्यावर ही मात करायला निघालो आहोत. म्हणूनच कि काय विविध संकटांना बळी पडत आहोत. जगण्यासाठी जर सगळी धडपड असेल तर मग या गोष्टीकडे दुर्लक्ष करून कसं चालेल ? म्हणूनच माणसानं वाट्याला आलेले जीवन पुरेपूर जगावं. जीवन ही राष्ट्रीय संपत्ती मानली जाते. ती नष्ट करण्याचा तुम्हाला अधिकार नसतो .मग ते दुसऱ्याचं असो कि तुमचं स्वतःचं. खून हा खून आहे तसा आत्महत्येचा प्रयत्न हा ही कायद्याने गुन्हा मानला जातो. इच्छामरण ही संकल्पना अद्याप मान्य झालेली नाही. थोडक्यात काय एकदा जन्माला आलात कि तुम्हाला जगण्याची जवळजवळ सक्तीच असते. मात्र ती फक्त जगण्याची आहे. मस्त मजेत जगण्याची सक्ती नाहीये.
का जगायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं. कसं जगायचं हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही रडत रखडत, टाचा घासत ही जगू शकता. ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे. बापजाद्यांची इस्टेट असेल तर उभा जन्म तुम्ही आय्याशी करत किंवा फक्त लोळत आणि म्हशीसारखा पाण्यात डुंबत ही काढू शकता. ते ही स्वातंत्र्य तुम्हाला आहे.
प्रश्न फक्त इतकाच आहे कि जगायचं आहे तर मजेत का जगू नये. सारे काही जगण्यासाठीच असेल तर आनंदाने आणि तृप्त भावनेने का जगू नये. त्यासाठी निरागस वृत्ती मनात बाळगून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ही मोठा आनंद मिळतो हे मनाला पटायला हवं. माणसं मोठी होतात आणि छोट्या-छोट्या आनंदाला पारखी होतात. नंतर मग फक्त जगणं आणि अवलंबून असणाऱ्यांना जगवणं हेच एक उरतं.
जुनी माणसे नेहमी म्हणायची कि *सर सलामत तो पगडी पचास*
म्हणजे जीवना पेक्षा महत्वाचं दुसरं काही नाही.म्हणूनच ते आनंदाने का जगू नये?जबाबदारी माणसाला कधीच सोडत नाही हे जरी खरं असल तरी म्हणून नीरस आणि कंटाळवाणे जगण्याला काहीच अर्थ नसतो.
*झाड फुलांनी आले बहरुन*
*कधी न पाहिले डोळे उघडुन*
अशीच आपली अवस्था होत असते. उशा जवळ दिवा असला तरी दृष्टी नसणाऱ्या व्यक्तीला त्याचा काहीच उपयोग नसतो. तसेच निसर्ग जरी खुणावत असेल परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर त्या निसर्गाच्या फुलण्याला ही काही महत्त्व उरत नाही.
———————-

*✒️ सुजाता नवनाथ पुरी*
*अहमदनगर*
8421426337

प्रतिक्रिया व्यक्त करा