You are currently viewing तळेरे-वैभववाडी-करुळ घाट रस्त्या तातडीने नव्याने करण्यात यावा

तळेरे-वैभववाडी-करुळ घाट रस्त्या तातडीने नव्याने करण्यात यावा

सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांची मागणी

तळेरे

तळेरे-वैभववाडी-करुळ घाट रस्त्यावरती जागोजागी मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे.वाहन चालकांना खूप कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सदरच्या मार्गाचे तातडीने चांगल्या आणि टिकाऊ दर्जाचे डांबरीकरण करावे अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यास पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे जे काही प्रमुख घाट रस्ते आहेत त्यापैकीच एक म्हणजे करूळ घाट रस्ता.दळणवळणासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा हा करूळ घाट मार्ग मानला जातो.कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार, पर्यटन असो अथवा आरोग्य सुविधा असो अशा सर्व महत्वपूर्ण बाबींसाठी सिंधुदुर्गवासीयांना पश्चिम महाराष्ट्र व त्यातील विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याशी सातत्याने अवलंबून रहावे लागते.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यास पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाट रस्त्याचे विशेष महत्व आहे.

तसेच सद्यस्थितीत मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामकाज सुरू व अपूर्ण असल्याने मुंबई ते गोवा या दरम्यानच्या वाहतुकीस ‘मुंबई – पुणे – कोल्हापूर – गगनबावडा – सिंधुदुर्ग – गोवा’ असा मार्ग सोईस्कर ठरत आहे.त्यामुळे या मार्गावर मागील काही काळात वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.

या मार्गावरुन सतत मोठ्या प्रमाणावरती वाळूची अवजड वाहतूक होत असते. त्याचबरोबर ओव्हरलोड वाळू वाहतूक होत असल्याने रस्त्याची पार दुर्दर्शा होत आहे.अवजड वाहतूक करण्यासाठी त्या योग्यतेचा व त्या दर्जाचा रस्ता आहे का? हे पण पाहणे आवश्यक आहे.परिणामी अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावरील वाहतुकीसाठी तांत्रिक दृष्ट्या असे रस्ते नसल्याने मागील काही काळ सदरच्या मार्गावरील करूळ घाट रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे.तसेच करूळ घाट रस्त्याच्या काही अवघड वळणांवर रस्ता शिल्लकच राहिलेला नाही.

यामुळे करूळ घाट रस्त्यावरील वाहतूक व प्रवास असुरक्षित ठरून अपघातांचे प्रमाणदेखील वाढलेले आहे. तसेच वाढलेले इंधनाचे भाव लक्षात घेता रस्त्यांच्या दुर्दशेमुळे वाहतुकीसाठी अधिक इंधन वापर व प्रवासात होणार शारीरिक त्रास यामुळे वाहन चालक व प्रवासी वर्गाला आर्थिक,मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्वांचा विपरीत परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार, पर्यटन, आरोग्य इ.अनेक महत्वपूर्ण बाबींवर होत असून ही बाब अत्यंत गंभीर आहे.

याबाबत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित रस्ते विभागाकडून वेळीच योग्य ती ठोस नियमोचित उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. तथापि तसे झाले असल्याचे दिसून येत नाही.सर्वसामान्य जनतेशी कोणतेही सोयरसुतक न बाळगणाऱ्या संबंधित रस्ते विभागाने अनेक ठेवणीतली कारणे शोधून काढत या करूळ घाट रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेला दिसून येतो. तसेच काही ठिकाणी तात्पुरती डागडुजी करीत घाट रस्त्याला नव्हे तर सिंधुदुर्गवासीयांच्या जखमेलाच मलमपट्टी केल्याचे भासवले जात आहे.

या सर्व परिस्थिती व समस्येबाबत सर्वसामान्य जनतेमधून संबंधित रस्ते विभागाच्या बाबतीत अत्यंत नाराजीचा सूर व्यक्त होत असून त्याबाबत ‘सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा उद्रेक करू पाहणारा हा संबंधित रस्ते विभागाने कसला घातलाय घाट?’ असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

सर्वसामान्य जनतेच्या भावनेची दखल घेत करूळ घाट रस्त्याच्या सुधारणेसाठीची संबंधित रस्ते विभागाने जर येत्या महिना अखेरपर्यंत कोणतीही ठोस नियमोचित कार्यवाही न केल्यास संबंधित रस्ते विभागास कायदेशीर नोटीस देऊन करूळ घाट रस्त्यातच सनदशीर मार्गाने आंदोलनात्मक उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा असे सामाजिक कार्यकर्ते तथा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 14 =