You are currently viewing सर्वसाधारण मृतदेह आणि कोरोना….

सर्वसाधारण मृतदेह आणि कोरोना….

सावंतवाडी स्मशानभूमी चिंतेचा विषय

संपादकीय….

सावंतवाडीत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून सावंतवाडीकरांच्या गरजेसाठी काम होताना दिसत नाही. आपल्याकडून कोणतेही विधायक काम झाले नसल्याने आपले अपयश झाकून ठेवण्यासाठी सावंतवाडीच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी कधी मटक्या, दारूचे, तर कधी भाजीपाला व्यापारी, टपरीवाले यांचे राजकारण होताना दिसत आहे.
सावंतवाडीत इतर तालुक्यांच्या मानाने कोरोनाचे रुग्ण कमीच भेटतात. कुडाळ, कणकवलीत लॉकडाऊन करूनही रुग्ण संख्या वाढतीच आहे. परंतु सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येत सावंतवाडीत लॉकडाऊन करण्याच्या प्रयत्नात आहेत. कोरोना फक्त बाजारपेठेत फिरत नसून सावंतवाडीत असलेल्या उपरल स्मशानभूमीत एकच स्मशानशेड आहे, त्याठिकाणी एकाच वेळेस कोविड-१९ पॉझिटिव्ह असलेले मृतदेह जाळत असतात आणि सर्वसामान्य इतर कारणांनी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह सुद्धा त्याचवेळेस पाच सहा फुटावर असलेल्या जागी जाळण्याची वेळ सावंतवाडीकर जनतेवर येते. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वसामान्य कारणांनी मृत्यू झालेल्या व्यक्तीला दहन करण्यासाठी आलेल्या लोकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोविडच्या मृतदेहाचे दहन सरकारी माणसांकडून पीपीई किट घालून केले जाते. मृतदेह दहन करताना सरणास आग लावून सरकारी माणसे निघून जातात, परंतु त्याचवेळेस इतर कोणाचाही मृतदेह दहन करण्यासाठी आल्यावर मात्र लोकांची कुचंबना होते. बरेच लोक सुरक्षेच्या कारणांनी स्मशानभूमीतून काढता पाय घेतात. परंतु सामाजिक बांधिलकी जपणारे मात्र अशावेळेस कोरोनाचे शिकार होण्याची भीती आहे. त्यामुळे कोविड-१९ ने मृत्यू झालेला मृतदेह दहन करण्यासाठी नगरपालिकेने अति तात्काळ विषय म्हणून दुसरी स्मशानशेड बांधणे अत्यंत गरजेचे आहे. सध्यस्थितीत बाहेर असणाऱ्या दहन करण्याच्या जागी पावसाळा असल्याने दहन विधी करणे अशक्य होतं आहे.
सावंतवाडीकरांच्या काळजीपोटी लॉकडाऊन हे शस्त्र उपसणाऱ्यांनी सावंतवाडीच्या जनतेस अभिप्रेत असलेली आणि अत्यावश्यक असलेली कामे केली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकतात. गरज आहे ती फक्त राजकारण विरहित सामाजिक हिताच्या दूरदृष्टीची…

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 3 =