You are currently viewing दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाची मुसंडी

दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाची मुसंडी

केसरकरांना डावलणे सेनेला भोवतेय का?

विशेष संपादकीय…..

महाराष्ट्रातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणूक १५ जानेवारीला पार पडल्या. अलीकडे ग्रामपंचायत पातळीपासूनच नेतेमंडळी आपल्या कार्याची पोचपावती द्यायला सुरुवात करतात त्यामुळे पूर्वी गाव मर्यादित गावविकास पॅनेलच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुका पक्षीय चिन्हांवर लढत नसल्या तरी पक्षीय पाठबळावर लढल्या जातात. काही पक्षाकडून नेत्यांकडून तर आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी बक्कळ पैसा दिला जातो बदल्यात ग्रामपंचायत मध्ये सत्ता ही अट ठेवली जाते. त्यामुळे अतिशय अटीतटीच्या लढती होऊन संघर्षमय वातावरणात निवडणुका पार पडतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेल्या निवडणुका देखील त्याला अपवाद नाहीत. प्रत्येक मतदारसंघातील आमदाराने आपापली शक्ती पणाला लावत जास्तीतजास्त जागा, ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात बहुतांशी ते यशस्वी झाले सुद्धा! परंतु सावंतवाडी तालुक्यातील सेनेच्या ताब्यातील सर्वच मोठ्या ग्रामपंचायती मात्र भाजपाने आपल्या कुशल नेतृत्वाने खेचून घेतल्या. परंतु शिवसेनेवर सावंतवाडी मतदारसंघात आलेली ही वेळ कोणामुळे? सावंतवाडी सारख्या शिवसेनेच्या आणि दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा वरचष्मा का झाला?
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, चौकुळ, मळगाव, कोलगाव, इन्सुली, दांडेली, मळेवाड या ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात होत्या. परंतु आज झालेल्या मतदानाच्या निकालानंतर सर्वच चित्र पालटले आणि या सर्व ग्रामपंचायतींमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत त्या आपल्याकडे खेचून आणल्या. या सर्व निकालात सेनेला दिलासा देणारा निकाल म्हणजे फक्त तळवडे ग्रामपंचायत सेनेच्या ताब्यात आली. परंतु सावंतवाडीत सेनेचा झालेल्या नामुष्कीजनक पराभवाला नक्की जबाबदार कोण? सेनेचे आमदार, खासदार, तालुकास्तरावरचे नेते की सेना नेतृत्व?
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वी आंबोली येथील सेनेचे कार्यकर्ते आणि केसरकर समर्थक दत्तू नार्वेकर हे भाजपावासी झाले हे देखील भाजपच्या पथ्यावर पडलं, आणि आंबोली ग्रामपंचायत सेनेला गमवावी लागली. सेनेची राज्यात सत्ता असूनही गावपातळीवर कार्यकर्त्यांना सेना नेतृत्वाकडून अथवा नेत्यांकडून पुरेसे पाठबळ मिळत नाही, आणि भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मात्र कार्यकर्त्यांना आर्थिक पाठबळ मिळतं, त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते जोमाने काम करतात तिथेच सेनेचे कार्यकर्ते कमी पडतात. त्याचाच प्रभाव मोठ्या प्रमाणावर निकालात दिसून येतो.
दुसऱ्या बाजूने विचार करायचा म्हटल्यास निवडणुका लागल्यानंतर सावंतवाडीचे आ.केसरकर यांनी मतदारसंघात प्रचार केला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश दिसून आला नाही. केसरकर मागील मंत्रिमंडळात सेनेचे महत्वाचे मंत्री होते, जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. त्यांच्या मवाळ स्वभावामुळे ते काही बाबतीत कमी पडले, त्यात राष्ट्रवादीशी युती झाल्यामुळे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आमदार असल्याने त्यांच्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आला. त्यात केसरकर गेले वर्षभर नाराजच आहेत. केसरकर यांचे समर्थक देखील मुख्य प्रवाहात दिसून येत नाहीत. केसरकर यांचे पंख कापण्याचे काम त्यांच्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या विरोधकांकडून केले गेले आहे. त्यामुळे केसरकर यांच्यावर पक्षाकडून झालेला दुर्लक्ष देखील सावंतवाडीत सेनेचा करिष्मा उतरण्यास कारणीभूत ठरला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
एकंदरीत सर्व बाबींचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशानंतर भाजपा वाढत चाललेली आहे, अगदी सावंतवाडीच्या बुरुजावर देखील भाजपाने पर्यायाने नारायण राणे यांनी धडक दिलेली असून जिल्ह्या बाहेरील रत्नागिरी येथील असलेले पालकमंत्री उदय सामंत देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेला बळकटी देण्यास, वाढविण्यास कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भविष्यातील शिवसेनेच्या वाटचालीसाठी शिवसेना नेतृत्वाला नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेनेच्या नेत्यावर जबाबदारी देऊन, मतभेद, नाराजी असेल तर ती दूर करून जिल्ह्याची विस्कटत चाललेली घडी पुन्हा बसवावी लागेल अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा वाढल्यास नवल वाटू नये.

This Post Has One Comment

  1. Mahesh lakhe

    या करीता मतदार संघामध्ये जनसंपर्क आसने खूप महत्त्वाचे असते आपल्या जनतेने निवडून दिलेले आहे.त्यामुळे जनतेच्या संपर्कात नेहमी राहाने गरजेचे आहे.आपल्याला पक्षाने पद दिले नाही म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा सोडुन तब्बल दहा महिन्यांने जनतेच्या संपर्कात येता यांचा अर्थ काय समजायचा जनतेने पद नसताना हि असे अनेक आमदार आपल्या मतदारसंघात करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आपल्या मतदारसंघात विकास करताना दिसतात.तुम्ही नाराज होऊन मुंबई मध्ये बसलात.त्यामुळे परीणाम तुम्हाला दिसतोय.कोरोनाच्या वेळी तुम्ही सावंतवाडी मध्ये असणे गरजेचे होते.आसो……….या नंतर आता काय……?

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × four =