You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदी लागणार अतुल काळसेकर यांची वर्णी??

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदी लागणार अतुल काळसेकर यांची वर्णी??

आम.रवींद्र चव्हाण यांचाच करिश्मा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक अति प्रतिष्ठेची करत केंद्रीय मंत्र्यांपासून आमदार, लोकप्रतिनिधी, नेते सर्वच मैदानात उतरले आणि जिल्हाभर निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले. चार नगरपंचायतीच्या निवडणुकीपेक्षाही महत्त्वाची केली ती जिल्हा बँक निवडणूक कारण जिल्ह्याची आर्थिक नाडीच जिल्हा बँकेच्या हातात असते. नगरपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या परंतु जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत संतोष परब यांच्यावर हल्ला झाला आणि जिल्ह्यातील वातावरण तंग बनले. नितेश राणे समर्थकांकडून हल्ला झाल्याचा आरोप झाला आणि नितेश राणे, संदेश सावंत, मनीष दळवी हे भूमिगत झाले कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जमीन देखील नामंजूर केला. त्यामुळे भीतीच्या वातावरणातच निवडणुका पार पडल्या. नारायण राणे यांनी जिल्ह्यात मुक्काम ठोकून निवडणुकीवर लक्ष ठेवला. परंतु खरा गेम तर तेव्हाच पालटला जेव्हा माजी राज्यमंत्री आम.रविंद्र चव्हाण यांची जिल्ह्यात एन्ट्री झाली. मनीष दळवी प्रचाराला फिरत नसतानाही ते निवडून आले हा देखील रवींद्र चव्हाण यांचाच करिष्मा म्हणायला हरकत नाही.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागताच निवडणुकीत पराभूत झालेले भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा भाजपा मध्येही सबकुछ आलबेल नाही हे सांगून गेला. राजन तेली निवडणुकीत पराभूत झाल्याने जिल्हा बँक अध्यक्षपदी मूळ भाजपाचे आणि संघाचे कार्यकर्ते असलेले अतुल काळसेकर यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चितच आहे. अतुल काळसेकर हे मूळ भाजपाचे कार्यकर्ते आहेत. अलीकडेच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये कुडाळ येथे मूळ भाजपाच्या कार्यकर्त्याना डावलल्यामुळे काहींनी बंडखोरी केली तर एकीने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे जुने नवे असे वाद होताना दिसून आले. जिल्हा बँक निवडणुकीत असे काही वाद नसले तरी आम.रवींद्र चव्हाण यांची जिल्ह्यात एन्ट्री होताच बदललेलं निवडणुकीचे समीकरण आणि रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारांना निवडून येण्यासाठी दिलेली ताकद यावरून रवींद्र चव्हाण यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत असलेला अंमल दिसून आला. जिल्हा बँकेचे निकाल लागल्यावर दोडामार्ग येथील शिवसेनेचे नेते प्रकाश गवस यांना राणेंनी भाजपामध्ये आणून तिकीट दिले तरी प्रकाश गवस पराभूत झाले होते. प्रकाश गवस पराभूत होऊनही दोडामार्ग बाजारपेठेत “रवींद्र चव्हाण आगे बढो” च्या घोषणा देत फुटलेले फटाके देखील रवींद्र चव्हाण यांचा जिल्हा बँक निवडणुकीतील करिष्मा आणि अंमल दाखवून देण्यास पुरेसा आहे.
भाजपाचे जुने शिलेदार असलेले आम.रवींद्र चव्हाण यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेत जिल्हा बँकेवर भाजपाचे कमळ फुलविले. त्यामुळे जिल्हा बँकेत मूळ भाजपाचे आणि संघ कार्यकर्ते असलेले अतुल काळसेकर अध्यक्षपदी बसतील अशी माहिती समोर येत आहे. नारायण राणेंच्या निवडणुकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेला देखील अतुल काळसेकर राणेंच्या शेजारी बसले होते, त्यामुळे जिल्हा बँक अध्यक्षपदाचे अतुल काळसेकर हेच दावेदार मानले जात आहेत. सर्व घडामोडी पाहता जिल्हा बँकेची नाडी मूळ भाजपाच्या हातीच राहण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 15 =