You are currently viewing भाजपा शहर मंडल अध्यक्षांकडून ७२० दिवस पूर्तीनिमित्त संजू परब यांचा सत्कार…

भाजपा शहर मंडल अध्यक्षांकडून ७२० दिवस पूर्तीनिमित्त संजू परब यांचा सत्कार…

सत्ताधारीच नगरसेवक मात्र नाराज…

सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे संजू परब निवडून आले त्याला काल ७२० दिवस पूर्ण झालेत. भाजपाचे पहिले नगराध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कारकीर्द पूर्ण केल्याच्या निमित्ताने सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष भाजपा अजय गोंदावळे यांनी मावळते नगराध्यक्ष संजू परब यांचा शहर भाजपाच्या वतीने सत्कार केला. या सत्कार सोहळ्याला सावंतवाडी व बांदा येथील संजू परब यांना मानणारे काही निवडक कार्यकर्ते हजर होते, सत्ताधारी गटातील नगरसेविका आणि एक दोन नगरसेवक वगळता इतर सत्ताधारी नगरसेवकांनी पाठच फिरवल्याचे दिसत होते. त्यामुळे सत्ताधारी गटातील नगरसेवकच नाराज असल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे. शहर भाजपा मंडल अध्यक्षांना जर यशस्वी ७२० दिवस पूर्ण केल्याने सत्कार करायचा होता तर पहिले भाजपाचे नगरसेवक म्हणून सत्तेत समाविष्ट असणाऱ्या सर्वच सत्ताधारी नगरसेवकांचा सत्कार होणे काही सत्ताधारी नगरसेवकांना अपेक्षित असल्याचे सत्ताधारी नगरसेवकांनी संवाद मिडियाशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे शहर भाजपामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचेच समोर आले आहे.
सावंतवाडी नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपाला साथ द्या ७२० दिवसात शहराचा विकास करून दाखवतो अशा वल्गना केल्या गेल्या. २४ तास पाणी, भुयारी गटार, कंटेनर थिएटर, आदी एक ना अनेक घोषणा केल्या, परंतु सावंतवाडी शहराने हा विकास पाहिला का? सावंतवाडीत पाणी पुरवठा सुरळीत होत होता परंतु आज तो विस्कळीत झालेला दिसून येतो. बबन साळगावकर यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली गार्डन ची संरक्षक भिंत सारखी कामे वगळता नव्याने विकास झालेला दृष्टीक्षेपात येतंच नाही. संत गाडगेबाबा मंडईत भाजी व्यापाऱ्यांना बसवलेले, परंतु खाजगी विकासकाकडून इमारत बांधणार, रात्रीच्या अंधारात झालेली पाहणी वगैरे विषय मागे पडताच आज पुन्हा परिस्थिती जैसे थे पहावयास मिळत आहे. त्यामुळे आपल्या मुलाने काहीतरी केलं म्हणून घरच्याच सदस्यांनी कौतुक करणे यापेक्षा शेजारच्या, आजूबाजूच्या, अशा शहरातील लोकांनी एकत्र येऊन केला तर तो मानसन्मान. त्यातही घरचेच काही आपल्या दाराला कडी लावून राहिल्याने आपणच आपल्या माणसाला इव्हेंट मॅनेजमेंट करून नावाजायचे किती? असा खोचक प्रश्नही काहींनी उपस्थित केला.
एकीकडे यशस्वी कारकीर्द पूर्ती आणि दुसरीकडे सत्तेतीलच नगरसेवकांची नाराजी हा सर्व प्रकार पाहता भविष्यात नाराज असलेल्या नगरसेवकांची भूमिका काय असेल? येत्या निवडणुकीत ते “सोबत राहतील की दुरूनच तमाशा पाहतील” असा महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा