You are currently viewing भारतीय रेल्वेचा एलएचबी कोच मध्ये परिवर्तन; अत्याधुनिक वंदे भारत कोचची निर्मिती सुरू

भारतीय रेल्वेचा एलएचबी कोच मध्ये परिवर्तन; अत्याधुनिक वंदे भारत कोचची निर्मिती सुरू

आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतीय रेल्वेने, परंपरागत इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) प्रकारच्या डब्यांसह कार्यरत गाड्यांना लिंक हॉफमन बुश (LHB) डब्यांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट आहेत आणि प्रवासाचा उत्तम अनुभव आणि सुरक्षितता प्रदान करतात. यासाठी 2018 पासून भारतीय रेल्वे फक्त लिंक हॉफमन बुश (LHB) कोचचे उत्पादन करत आहे. केंद्रीय रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

नोव्हेंबर, 2021 पर्यंत, रेल्वेच्या 575 जोड्या लिंक हॉफमन बुश (LHB) कोचमध्ये परिवर्तित करण्यात आल्या आहेत. कार्यरत व्यवहार्यता आणि कोच उपलब्धतेनुसार इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) कोचचे लिंक हॉफमन बुश (LHB) डब्यांमध्ये रूपांतर टप्प्याटप्प्याने करत आहे. याशिवाय, अत्याधुनिक वंदे भारत कोच तयार केले जात आहेत आणि रेल्वे गाड्यादेखील समाविष्ट केल्या जात आहेत. हमसफर, तेजस, अंत्योदय, उत्कृष्ट डबल डेकर वातानुकूलित यात्री (UDAY), महामना, दीन दयालू आणि विस्टाडोम यांसारख्या सुधारित वैशिष्ट्यांसह विविध कोच भारतीय रेल्वेमध्ये समाविष्ट केले जात आहेत. भारतीय रेल्वे राज्यानुसार रेल्वे गाड्या चालवत नाही किंवा डब्यांचे रूपांतरही करत नाही, असे वैष्णव यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा