You are currently viewing गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे “करिअर कट्टा” कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे “करिअर कट्टा” कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या करियर कट्टा या उपक्रमाची माहिती सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील प्राचार्य व समन्वयक यांना देण्यासाठी “करिअर कट्टा” ही कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालय याठिकाणी मंगळवार दिनांक 7 डिसेंबर रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे यांनी करिअर कट्टा विभागाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये त्यांनी आयएएस आपल्या भेटीला , उद्योजक आपल्या भेटीला, सायबर सिक्युरिटी चे कोर्सेस, कौशल्य विकास अंतर्गत येणारे कोर्सेस, संविधानाचे पारायण, वृत्तवेध कार्यक्रम, कॉमर्स विभागासाठी चा ई-फायलिंग कोर्स, यूपीएससी परीक्षेची संपूर्ण तयारी या व इतर अनेक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रकर्षाने व जाणीवपूर्वक सांगितले की “करिअर कट्टा” हा फक्त स्पर्धा परीक्षेसाठी चा उपक्रम नसून स्पर्धा परीक्षा हा करिअर कट्टा विभागाचा फक्त दहा टक्के भाग आहे. सध्याचा विद्यार्थी हा नोकरी मागणारा नसावा तर उद्योगाच्या माध्यमातून नोकरी देणारा असावा यासाठी उद्योजक आपल्या भेटीला हा उपक्रम राबवला जात आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी जोमाने करावी परंतु त्यातून मिळणाऱ्या अपयशाला सुद्धा सामोरे जाण्याची क्षमता ठेवावी व त्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध ठेवावा म्हणजेच आपला “बी प्लॅन” तयार असावा. असे प्रतिपादन शितोळे सर यांनी केले.
करियर कट्टा हा उपक्रम विद्यार्थी केंद्रित तर आहेच व याच्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयांमध्ये इंक्युबॅशन सेंटर विकसित करण्याचा प्रयत्नदेखील होणार आहे. प्रत्येक महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकासाचे विविध कोर्सेस सुरू होणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयाला कौशल्य विकासाचे केंद्र बनविण्यासाठी करियर कट्टा या विभागाची जोडले जाणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी करिअर कट्टा या उपक्रमाची जोडले जाऊन स्वतःच्या भवितव्याचा एक उज्वल मार्ग निर्माण करावा असे आवाहन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना व प्रमुख पाहुण्यांची ओळख रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रा. ऋषिकेश सुर्वे यांनी करून दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.पी. कुलकर्णी यांनी भूषविले. या कार्यक्रमासाठी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी चे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे तसेच कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा चे डॉ. चव्हाण उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गुहागर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सावंत सर व कुडाळ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. भावेश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयीन समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ. अजित दिघे यांनी केले

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − four =