You are currently viewing दि.७ डिसेंबर रोजी करिअर कट्टा कार्यशाळेचे आयोजन

दि.७ डिसेंबर रोजी करिअर कट्टा कार्यशाळेचे आयोजन

वैभववाडी
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व समन्वयक यांच्यासाठी मंगळवार दिनांक ७ डिसेंबर,२०२१ रोजी सकाळी ११:३० वा. रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालय याठिकाणी “ करीअर कट्टा कार्यशाळा” आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आणि भारतीय प्रशासकीय सेवेच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई,पुणे व दिल्ली या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील युवक मोठ्या प्रमाणामध्ये शहराकडे जात आहेत. विद्यार्थ्यांचा शहराकडील ओढा कमी व्हावा, त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लागणारा खर्च सामान्यांच्या आवाक्यात यावा यासाठी करिअर कट्टा विभागामार्फत दिल्ली व मुंबई किंवा भारतामध्ये इतरत्र कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे ऑनलाईन दररोज एक तास याप्रमाणे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. प्रत्यक्ष प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे अनुभव विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा तर देतातच पण त्याचबरोबर त्यांचा प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठीचा दृष्टिकोन सुद्धा बदलण्यासाठी मदत होत आहे. यामुळे करियर कट्टा या विभागाचे महत्त्व व व्याप्ती सुद्धा वाढत चालली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना “उद्योजक आपल्या भेटीला” या ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये दररोज एका उद्योजकामार्फत उद्योग कसा उभा करावा? त्यासाठी लागणारे भांडवल कसे उभे करावे? उद्योगाचे मार्केटिंग कसे करावे? व इतर इतंभूत माहिती दिली जात आहे. करिअर कट्टा विभागामार्फत जास्तीत जास्त महाविद्यालयांमध्ये इंक्युबॅशन सेंटर विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच अनेक महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे कौशल्य विकासावर आधारित कोर्सेस सुरु केले जात आहेत. महाविद्यालय हे कौशल्य विकासाचे केंद्र बनावे हा करिअर कट्टा विभागाचा मानस आहे. वृत्तवेध, भारतीय संविधानाचे पारायण, वेगवेगळ्या बँकिंग क्षेत्रातील भरतीच्या कार्यशाळा, यूपीएससीसाठीची तयारी व सायबर सिक्युरिटीचे कोर्सेस या सारख्या उपक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी करिअर कट्टा मोलाची भूमिका बजावत आहे.
हा “करिअर कट्टा “ प्रत्येक महाविद्यालयांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी या उपक्रमाची संपूर्ण माहिती देण्यासाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्राचार्य व समन्वयक यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे हे सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी उच्च शिक्षण कोकण विभाग पनवेल विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप, मुंबई विद्यापीठ सबसेंटर संचालक डॉ. किशोर सुखटणकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यशाळेसाठी सर्व महाविद्यालयीन प्राचार्य व समन्वयक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करिअर कट्टा विभागाचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्री. ऋषिकेश सुर्वे व सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ. अजित दिघे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा