You are currently viewing कोविड 19 ने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्य देण्यासाठी mahacovid19relief.in वर अर्ज करा

कोविड 19 ने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्य देण्यासाठी mahacovid19relief.in वर अर्ज करा

– जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

कोविड 19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकास 50 हजार इतके सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह mahacovid19relief.in या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा. या करिता अर्जदार स्वतः सेतु केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत सीएससी.एसपीव्ही मधून अर्ज करू शकेल, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिली.

                कोविड 19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबात  सर्वोच्च न्यायालयाने दि. 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन ( आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी निर्गमित केला आहे.

                या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने ऑनलाईन वेब पोर्टल विकसित केले असून, याद्वारे कोविड 19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉगिन करणे आवश्यक राहील. याकरिता अर्जदार स्वतः किंवा सेतु केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करू शकेल.

                अर्ज दाखल करताना पुढील कागदपत्रे / माहिती सादर करणे बंधनकारक राहील. अर्जदाराची आधार कार्ड प्रत, मृत व्यक्तीची आधार कार्डची प्रत, जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा 1969 अंतर्गत मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, अर्जदाराचा आधार लिंक केलेला बँक खाते क्रमांक, अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेकची प्रत, मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, आरटीपीसीआर अहवाल प्रत किंवा सीटी स्कॅन किंवा इतर वैद्यकीय कागदपत्रे ( जेंव्हा कागदपत्र क्र. 6 उपलब्ध नाही), इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र.

                या कागदपत्रांच्या आधारे अर्जदारास स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदाराने शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दि. 13 ऑक्टोबर 2021 अन्वये जिल्हास्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करावेत. या तक्रार निवारण समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचे अधिकार असतील.

                सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील , जेणे करून मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे या करिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग – दूरध्वनी – 02362-228901, 228540, तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा नियंत्रण कक्ष – 02362-228847/1077 येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + five =