You are currently viewing जिल्हा बँकचे संचालक प्रकाश गवस भाजपात; नितेश राणेंनी केलं स्वागत!

जिल्हा बँकचे संचालक प्रकाश गवस भाजपात; नितेश राणेंनी केलं स्वागत!

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश गवस यांनी शुक्रवारी आमदार नितेश राणे व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत अस्तित्वात असलेले पॅनल राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते आणि उद्या होणाऱ्या निवडणुकीतही राणे साहेबांच्या नेतृत्वाखालील पॅनलच विजयी होईल, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्रात अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात सहकार वाढवण्यासाठी आणि जिल्हा बँकेच्या पारदर्शक कारभारासाठी राणेसाहेबांच्या पॅनलच्या उमेदवारांशिवाय पर्याय नाही, याची जाणीव झाल्यानेच श्री. गवस यांनी भाजपच्या पॅनेल मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर गवस यांनी यापूर्वी तब्बल दोन टर्म काम केले आहे. त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करून जिल्हा बँकेसाठी अर्ज सादर केल्याने त्यांची उमेदवारी महाविकास आघाडी समोर आव्हान निर्माण करणारी असणार आहे. प्रकाश गवस यांनी दोडामार्ग विकास संस्था मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, अतुल काळसेकर, रणजित देसाई, संध्या तेरसे, राजेंद्र म्हापसेकर, संतोष नानचे, प्रकाश मोरये, एकनाथ नाडकर्णी आदी उपस्थित होते.

आमदार नितेश राणे यांनी प्रकाश गवस यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या अनुभवाचा भाजपला निश्चितपणे फायदा होईल, असे सांगितले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर टीका केली. शिवरामभाऊ जाधव, डी. बी. ढोलम यांच्या सारख्या अध्यक्षांनी बँक वाढवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र विद्यमान अध्यक्षांनी बँकेचे मतदार कसे कमी होतील, यासाठी प्रयत्न केले. मात्र या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे १९ पैकी १९ ही उमेदवार भाजपच्याच पॅनलचे निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 3 =