You are currently viewing फोंडाघाटचे लोकप्रिय सात्विक-जेष्ठ तपस्वी नाना तथा मधुकर नेरूरकर यांचे देहावसान!

फोंडाघाटचे लोकप्रिय सात्विक-जेष्ठ तपस्वी नाना तथा मधुकर नेरूरकर यांचे देहावसान!

फोंडाघाट

येथील लोकप्रिय सात्विक तपस्वी व ज्येष्ठ नागरिक नाना उर्फ मधुकर हरी नेरुळकर (९४वर्षे) यांचे, वृद्धापकाळाने राहत्या घरी रात्री ७:३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुली असा मोठा परिवार आहे. संपूर्ण जिल्ह्यात आणि ज्ञाती बांधवात ते “नाना नेरुरकर” या नावाने सुपरिचित होते.

त्यांच्या निधनामुळे फोंडाघाट गावातील आबालवृद्धांशी मनमिळावू , माहितीचा खजिना, प्रेमळ, तपस्वी गमावल्याचे दुःख व्यक्त होत आहे. कला- नाट्य- संगीत- क्रिकेट आणि परोपकार यांचा नानांना व्यासंग होता. त्यांच्या म.गांधी चौकातील “सरदार विश्रांती-गृह” नावाच्या जुन्या हॉटेलच्या आठवणी-चर्चा आजही गप्पातून पेठे मध्ये ऐकायला मिळतात. हॉटेलात आलेला, प्रसंगी पैसे नसले तरी तृप्त होऊन गेला पाहिजे असा त्यांचा दंडक होता. गेल्या सात-आठ वर्षांपासून त्यांनी हे हॉटेल बंद करून निवृत्ती स्वीकारली होती.

नाट्य वेडापायी “देवमाणूस” नाटकातील त्यांच्या त्याकाळी गाजलेल्या भूमिकेनंतर, त्यांची जीवनशैलीच बदलली. इतर वेळी कमरेला पंचा आणि कार्यक्रमा प्रसंगी काळी टोपी, पांढरा सदरा, हातात काठी आणि अंगावर पांढरे उपरणे असा पोशाख, त्यांनी शेवटच्या घटकेपर्यंत अंगीकारला.

नाथ पै, मधु दंडवते यांच्या मुशीतून तयार झालेला समाजवाद त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात मनस्वी जोपासला.आणि आचरणातही आणला. त्यांच्या जाण्यामुळे पंचक्रोशीत तीव्र दुःख व्यक्त होत असून, सकाळी अंत्ययात्रेत पंचक्रोशीसह तालुक्यातील विविध स्तरातील लोकांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली…

प्रतिक्रिया व्यक्त करा