You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीचे बिगुल वाजले!

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीचे बिगुल वाजले!

२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन सादर करण्याची मुदत : ३० डिसेंबरला मतदान

मालवण

सर्वांची उत्कंठा लागून असलेला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. त्यानुसार आजपासूनच म्हणजे २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल होणार असून ३० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, राज्य निवडणूक प्राधिकरण कार्यालय, सहकार आयुक्त यांच्या संकेतस्थळावर या निवडणुकीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

विद्यमान भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कॉंग्रेस मध्ये असताना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या ताब्यात होती. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर या बँकेवर शिवसेना आणि महाविकास आघाडीचे प्राबल्य दिसून आले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कंबर कसली आहे. तर महाविकास आघाडीचीही या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या बँकेच्या निवडणूक प्रक्रिये विरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे ही निवडणूक लांबली होती. मात्र उच्च न्यायालयाने या सर्व हरकती फेटाळल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा