You are currently viewing नात्यांची वीण
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

नात्यांची वीण

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा अप्रतिम ललित लेख

अरे, मला न सांगता तुम्हीच कसे फिरायला गेलात? का रे?
गेल्या कित्येक वर्षात आपण असे कधीच चुकूनही एखाद्याला वेगळा ठेऊन कुठेच गेलो नाहीत, प्रत्येक वेळी एकत्रच गेलो, मग तुम्ही असं का वागलात?……
माझं काही चुकलं का? मी तुमच्यापैकी कोणाशी वाईट वागलो का?……तुम्हाला न सांगता कुठे एकटा गेलो का? मग तुम्ही चौघेच कसे काय गेलात मला एकट्यालाच न सांगता?

अरे थांब थांब…..किती हे प्रश्न तुझे?
तुला एकटं पाडून आम्ही नाही गेलो….तुझ्या कामात तू व्यस्त होतास….मग आम्ही जातो म्हटल्यावर काम टाकून तू येशील, त्याचा तुला तोटा होईल…..म्हणून आम्ही काही वेळासाठी गेलो होतो…पार्टी वगैरे काही केली नाही रे….तुझ्याशिवाय आम्ही पार्टी करू का?
आपलं पाच जणांचं नातं हे केवळ बोलण्यासाठी मैत्रीचं नातं नाही आहे रे…..रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट आहे आपल्या नात्याची वीण…
मग तूच सांग विणलेली नात्याची ही वीण तुला तोडून जाईल का?
गैरसमज नको करून घेऊस… तुझं काम आटोपलं की जाऊ एकत्रच पार्टीला….धमाल करूया मस्त…

खरंच मैत्रीचं नातं हे असंच असतं… वरवर सहज भासलं तरी आतून मजबूत, घट्ट असतं….
“फेविकॉल का मजबूत जोड” असल्यासारख्याच….
एवढी घट्ट मैत्री होण्यासाठी आपण बालमित्र तर नव्हतो….किंबहुना शाळा, कॉलेजमध्ये देखील एकत्रही नव्हतो….आकाशातून उडणाऱ्या पक्षांच्या थव्यामध्ये कोण जाणे सर्व एकमेकांस ओळखत असतील का? पण ते उडतात एकाच गलक्यातून आणि पुन्हा गलका होऊन बसतातही एकत्रच…..
आपलं मात्र तसंही नव्हतं….पाच जण वेगवेगळ्या मार्गाचे….एक धंदा करणारा…दुसरा नोकरीवाला…कुणी दुकानदार…हॉटेल व्यावसायिक तर एक वकील…. मार्ग वेगळे होते पण एक व्हायचो ते मित्र म्हणूनच…
गुलाबाकडे भुंगा आकर्षित होतो….नदी सागराकडे धाव घेते… पावसाची सर धरतीच्या प्रेमापोटी धरणीवर येऊन विसावते….डोंगर कपारीतील झऱ्यांचे पाणी दगड धोंड्याना आपटत नदीत मिसळते…..बाष्प बनून पुन्हा एकदा ढग होऊन आकाशाकडे झेप घेतं.. वेली सुद्धा झाडांना घट्ट मिठी मारून उंच उंच जातात…प्रत्येकाचं एक वेगळं नातं असतं एकमेकांशी…
नात्यांची ही वीण कुठेतरी घट्ट विणलेली असते म्हणून तर एकरूप होतात… नातं रक्ताचं नसूनही….अगदी आपल्या मैत्रीसारखे….

कोण काय करतो…किती कमावतो… आपण कधीच पाहिलं नाही….ना कधी एकमेकांच्या विरोधात वाईट बोललो ना वाईट चिंतलं… म्हणून तर आजही आपल्या नात्यांची वीण घट्ट होती…आपल्या मैत्रीच्या नात्यांमध्ये विणली गेली होती ती आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातील वेगवेगळी नाती….अन त्या नात्यांच्या विणेचा एक सुंदर फुलांचा गजरा बनला….चहूकडे सुगंध दरवळत ठेवणारा…
जन्मापासून मिळालेली रक्ताची नाती…ही कधीच विभक्त नसतात, ती दूर राहिली तरी त्यांची एकमेकांबद्दल ओढ कायम असते….रक्त रक्ताकडे आपोआपच खेचून जातं…. पण तरीही एकदा का स्वार्थ नात्यात प्रवेशकर्ता झाला की त्या नात्याची वीण उसवायला सुरुवात होते….आणि एक जरी धागा…अगदी गैरसमजातून जरी तुटला गेला तर कमकुवत झालेली नात्यांची वीण आपोआप तुटते…विस्कळीत होते…रक्ताची….जवळची असलेली नाती दुभंगतात….दुरावतात….मनाने जरी दूर झाली नाहीत तरी….शरीराने दूर होतात…

*स्वप्नांचे उंच मनोरे बांधायची सवय लागली की,*
*वास्तवात मिळालेल्या छोट्याश्या ठेचेनेही कोसळायला होतं…*

आपलं नातं मात्र मजबुरीने जवळ आलेल्या रक्ताच्या नात्यासारखं कधीच नव्हतं…एकमेकांच्या खांदावर हक्काने हात टाकून कानात गुपितं सांगत आपल्यातच धुंद होत जाणारं….पहाटेच्या धुक्यात चिंब भिजवणारं….सागराच्या उसळणाऱ्या लाटांसारखं उसळणारं… चिंचेसारखं आंबट गोड….स्वाद चाखूनही जिभेवर गोडवा ठेवणारं…..निरागस नातं होतं.
दुसऱ्याबद्दल असूया तर कधी मनाला शिवलीच नाही…”तुझं माझं” असा कधी विचार देखील मनात आला नाही….कित्येकदा केलेली मौजमस्ती…मिळणारा आनंद वाटून घेतला…आणि तीच तर मजा असते मैत्रीत अन मैत्रीच्या खोलवर रुजलेल्या नात्यात…
कधी समुद्राकाठी तर कधी डोंगरावर…..रात्र रात्र चालणाऱ्या…. पार्ट्या ….ती चांदणी रात्र….उबेसाठी पेटवलेली शेकोटी…अंगाला झोंबणारा गार वारा…थरथरणारे ओठ….हातावर हात घासत….हातांना उबदार करत….मऊशार वाळूत अलगद पहुंडत आकाशातील चमचमणारे तारे पहायचे……मध्येच तुटून पडलेल्या ताऱ्याकडे आपल्याच मैत्रीसाठी एखादं मागणं मागायचं….
स्वार्थ तर मागणे मागण्यातही नव्हता…होतं ते मैत्रीतील प्रेम…आणि मैत्रीवरचा विश्वास…
अभंग…अतूट…
भांडणंही व्हायची….एकमेकांच्या कुरापती निघायच्या….
पण एक तत्व पाळलं होतं…
“भांडण करणाऱ्यांपेक्षा भांडण लावणाऱयांपासून सावध राहायचं…
कारण भांडण करणारे दिसतात पण भांडण लावणारे ओळखू येत नाहीत…”
रात्र जागवायची तर..मग ती सिगारेटच्या झुरक्यात आणि ग्लासातील दारूच्या नशेत जागविण्यापेक्षा….मजा मस्तीत काळोखातल्या अनन्य साधारण सौंदयाचा आस्वाद घेत….झाडांमधून उडणारे काजवे….रात्रकिड्यांचा किर्रर्रर्रर्र आवाज…अन मध्येच भयाण शांतता…..त्यात पुन्हा एखाद्यावर किस्सा…कुरापती.. पण कितीही कुरापती काढल्या तरी एकी मजबूत असायची….
दुधात थोडं पाणी मिसळलं तर दूध पातळ होतं…. पण आपला रंग बदलत नाही…
तशीच मैत्री होती..उणिधुणी काढली तरी क्षणिक चिडणारी, रागावणारी आणि क्षणात हसणारी…हसवणारी…मैत्रीच्या नात्यात गुंफले होते मनाचे धागे….म्हणून तर बनली होती घट्ट नात्यांची वीण…

सागरात शिंपल्यात मोतीही सापडतात आणि चिखलही… शिंपला जोपर्यंत उघडला जात नाही तोपर्यंत त्यात मोती आहे, मास आहे की चिखल हे समजत नाही…तसंच होतं कधीतरी मैत्रीतल्या एखाद्या मित्राच्या वागण्याने…स्वभावाला औषध नसतं…. मौजमजेचं वय असेपर्यंत सर्वकाही आलबेल असतं….एक दुसऱ्यांसाठी प्रेम असतं… सद्गुण आणि दुर्गुण हे प्रत्येकात असतात…पण एकदा का सद्गुण लपून दुर्गुण डोकं वर काढू लागला की दुसऱ्यांबद्दल असलेलं प्रेम लुप्त होतं, आपलं भलं झालं की दुसऱ्यांच्या वाईटावर हसायची संधी साधली जाते…नसणाऱ्या खोट्या गोष्टी खऱ्या करून बोलल्या जातात…एखाद्याची मजा पहायची….आणि आनंद लुटायचा ही प्रवृत्ती….तिथूनच मैत्रीची वीण कमकुवत होते…एक एक करत धागा एकमेकांपासून तुटू लागतो…आणि कधीकाळी घट्ट, मजबूत असणारी मैत्रीच्या नात्यातील वीण…. सैल पडते….अविश्वासाच्या फेऱ्यात अडकते…तिथेच घात होतो मैत्रीचा आणि मैत्रीच्या नात्याचा…कायमचाच….परत कधीही वीण न विणण्यासाठीच…
*खोलवर दुखावलेली माणसं, एकतर पूर्णपणे कोलमडून जातात आणि आयुष्यभर दुखी राहतात. किंवा काहीजण दुःखाश्रू पिऊन इतके रुक्ष होतात की कोणाला विश्वासही बसत नाही की कधी काळी हेमित्रसुद्धा भावनाप्रधान होते, म्हणून मित्रांनो मित्रांना दुखावू नका.* 🤗🤗🤗

©{दिपी}
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग,८४४६७४३१९६
२३/११/२१

प्रतिक्रिया व्यक्त करा