You are currently viewing जिव्हाळा

जिव्हाळा

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी दीपक पटेकर यांची काव्यरचना

दवबिंदूंचे तुषार नाजूक पातीवर थबकले
कुणास ठाऊक कसे गवताच्या प्रेमात पडले

ऊन पडता पातीवर मोत्यासारखे चमकले
गवताचे पाते ही तेव्हा मज श्रीमंतच भासले

प्रेम म्हणू की जिव्हाळा कधी न ते समजले
उन्हात दवबिंदू पात्यात क्षणात विरूनी गेले

क्षणभंगूर ते मिलन जीवन एका रात्रीतले
भेट स्मरता आठवती शहारे त्या स्पर्शातले

गारवा देत रात्री कधीतरी वारे होते हसले
मिठीत घेऊन दवबिंदूंना पाते कोवळे फसले

पुन्हा एकदा नव्याने स्वप्न उद्याचे पाहिले
वाट पाहत दवबिंदूंची पाते रात्र रात्र जागले

©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६
११ नोव्हेंबर २०२१

प्रतिक्रिया व्यक्त करा