You are currently viewing तिमीर जातोच.. सूर्य येतो …

तिमीर जातोच.. सूर्य येतो …

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

जोडूनिया धन पहा माणसांचे
करावा विचार माणसाने
सुख गुणाकार दु:ख्ख भागाकार
येतसे आकार आयुष्याला…

 

दगड नि घोंडे ठेचा लागतील
अनुभव गाठी जोपासावा…
चुका शिकविती माणसा जीवन
होतसे शहाणा रोज रोज ….

माणूस हे धन पहा अनमोल
तोलू नका त्यास तराजूत
चुकतो माणूस समजून घ्यावे
माणूसपणाचे लक्षण ते …

स्वत: सावरावे इतरांस हात
पाही जगन्नाथ वरूनी तो
समाधान आहे संचित आपुले
साठवावे त्यास नित्य नेमी …

फसविणे दुजा आहे मोठे पाप
फुकाच संताप करू नये
न बोलून मारावे दुर्लक्ष करावे
साध्य होती हेतू आपुलेच …

“काळ”हाती पहा लागतच नाही
क्षणक्षण जाई विखरून
म्हणून जपावा प्रत्येकच क्षण
साठवावा मनी जपावा तो…

शोधावी म्हणजे सापडते वाट
आयुष्याचा घाट करू नये
किती ही असू दे कठीण तो काळ
तिमीर जातोच सूर्य येतो ….

 

प्रा.सौ.सुमती विश्वासराव पवार
(९७६३६०५६४२)
दि: ७ नोव्हेंबर २०२१
वेळ : ९: ४५ सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =