You are currently viewing ” अखेरचा मुजरा “

” अखेरचा मुजरा “

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, जेष्ठ कवयित्री लेखिका सौ ज्योत्स्ना तानवडे यांची काव्यरचना

आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना विनम्र अभिवादन.🙏🙏

इतिहासाच्या वाटेवरचा
देखणा प्रवास सरला
शिवधर्माचा सच्चा उपासक
शिवतेजात विलीन झाला ||

कित्येक दशके तळपली
ज्यांच्या वाणीची तलवार
शिवरायांची कथा मांडली
तेजस्विता जिची अपरंपार ||

असंख्य शब्दोत्सवातूनी
शिवप्रेमाचे बीज रुजविले
शिवतेजाची ओढ लावुनी
शौर्य स्फूर्तीचे वेड लाविले ||

‘जाणता राजा’ महानाट्यातून
साक्षात शिवशाही उभी केली
त्या दैदिप्यमान पर्वाची धग
असंख्यांनी अनुभवली ||

त्या वाणीला विराम मिळता
शिवकथा आज मूक झाली
शिवशाहीर बाबासाहेबांना
विनम्र आदरांजली !! 🙏
विनम्र आदरांजली !! 🙏

ज्योत्स्ना तानवडे.
वारजे, पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × five =