You are currently viewing शब्दसखा, आम्ही बालकवी, बालकवी शाळा सिंधुदुर्ग यांच्या त्रिवेणी संगमातून पार पडला विविधारंगी कार्यक्रम

शब्दसखा, आम्ही बालकवी, बालकवी शाळा सिंधुदुर्ग यांच्या त्रिवेणी संगमातून पार पडला विविधारंगी कार्यक्रम

सिंधुदुर्ग जिल्ह्याला साहित्य आणि कलेचा वारसा लाभलेला असून जिल्ह्याने अनेक नररत्ने साहित्य क्षेत्राला दिलेली आहेत. जिल्ह्याचा हाच साहित्याचा वारसा आज अनेक विभूती आपापल्या परीने जपण्याचा प्रयत्न करत आहेत. साहित्य संमेलन, कवी संमेलन, कोजागरी संमेलन अशा विविध माध्यमातून देवी सरस्वतीची आराधना केली जात आहे. असाच साहित्यिक क्षेत्रात साहित्याचा कलेचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे तो शब्दसखा न्हावेली, ता.सावंतवाडी, आम्ही बालकवी, आणि बालकवी शाळा सिंधुदुर्ग या तिन्ही संस्थांनी. तिन्ही संस्थांच्या त्रिवेणी संगमातून न्हावेली येथील कै. सखाराम मोर्ये यांच्या वास्तूतील शब्दसखा वाचनालयाच्या हॉलमध्ये दिनांक १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ३.०० वाजल्यापासून रात्री ७.०० वाजेपर्यंत विविधारंगी कार्यक्रमांची मेजवानीच पेश करण्यात आली. सोनूर्ली हायस्कुलचे मोर्ये सरव भाऊ कोचरेकर यांच्या सहकार्याने शब्दसखा ग्रुप ने अतिशय नियोजनबद्ध आयोजन केले होते. त्यांना शब्दसखाचे श्री व सौ आजगावकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
प्रथम सत्रात प्रमुख पाहुण्याचा परिचय व स्वागत केले गेले. प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून आजगाव डीएड महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री रुपेश पाटील सर, कवी दीपक पटेकर, व आम्ही बालकवी सिंधुदुर्ग संस्थेचे राजेंद्र गोसावी हे लाभले होते. दीपप्रज्वलन झाल्यावर मान.रुपेश पाटील सरांच्या अध्यक्षीय मनोगतानंतर निवडक सत्कार करून इशस्तवनाने व कु.तन्वी गोसावी हिच्या गणेश आराधना नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्री वंदन गोसावी, कु.अंकुश आजगावकर, श्री तुळशीदास पाटकर सर, सौ आदिती मसुरकर,सौ मोर्ये मॅडम यांनी गीत गायन, तर कु. साईश फटनाईक हिने नृत्य सादर केले. कु.केतकी आपटे,कु.किमया फटनाईक व श्रीमती आपटे मॅडम, यांनी काव्यवाचन केले, तर अफलातून अभिनय व संवाद फेकीने सर्वांची मने जिंकली ती कु.स्वराज व कु. अभ्यंग मसुरकर यांच्या एकपात्री नाट्यप्रयोगाने. शब्दसखा तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी “पणती जपून ठेवा” हे समूह गीत गायले. कु.तन्वी गोसावी, कु. अंकुश आजगावकर, श्री वंदन गोसावी, श्री पाटकर सर, रामा पोळजी सर यांच्या सुमधुर गायनाने कार्यक्रमाला उत्तरोत्तर शोभा येत गेली.
बारावी सायन्स मध्ये शिकत असलेली कु.रिया सावंत हिच्या पेन्सिल चित्रकलेची सर्वांनीच वाहवा केली. मिस दीपावली मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त कु.तन्वी गोसावी, आपटे मॅडम आदी सर्वांचे अभिनंदन करत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री रुपेश पाटील सरांनी श्री मोर्ये सर व राजेंद्र गोसावी यांचा छोटेखानी मुलाखत कार्यक्रम घेतला व त्यांची मते जाणून घेत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मोर्ये कुटुंबाने सादर केलेल्या “या झोपडीत माझ्या” भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कवी दीपक पटेकर यांनी आपल्या मनोगतातून शब्दसखा व बालकवी ग्रुपच्या सर्व कलाकारांचे कौतुक केले आणि शब्दसखा ग्रुप च्या आजगावकर सर आदी मंडळींच्या उत्तम आयोजनाची तारीफ केली. आभार प्रदर्शन न्हावेली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्मिता नाईक मॅडम यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आजगावकर सरांनी करत आपल्या उत्कृष्ट आयोजनाची झलक दाखवून दिली. सामुहिक पसायदानाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. सदर कार्यक्रमात छोटेखानी अल्पोपहाराचे देखील आयोजन शब्दसखा ग्रुप, न्हावेली कडून करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून शब्दसखा ग्रुप, आम्ही बालकवी, बालकवी शाळा आदी तिन्ही संस्थांचे सदस्य, मसुरकर सर, भाऊ कोचरेकर, पालक, मुले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 20 =