You are currently viewing जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचा यशस्वी तपास

जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचा यशस्वी तपास

सावंतवाडीतील दुहेरी खून प्रकरणातील आरोपी गजाआड

संपादकीय…..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शांत शहर म्हणून ओळख असणाऱ्या सावंतवाडीत काही दिवसांपूर्वी दुहेरी हत्याकांड उघडकीस आले होते. भर वस्तीत एका जुन्या घरात एकट्याच राहणाऱ्या दोन वृद्ध व्यक्तींचा झालेला खून ही सावंतवाडीच्या इतिहासात घडलेली पहिलीच दुर्दैवी घटना होती. त्यामुळे सावंतवाडी शहर या खून प्रकरणाने हादरले होते. तपास सुरू असतानाच चप्पलला रक्त लागलेले ठसे दारावरील गोणपाटावर सापडल्याने गुन्हा घडलेल्या स्थळाच्या शेजारील संशयित युवकाला पोलिसांनी तपासासाठी बोलावले होते, परंतु त्यानंतर त्या युवकाने घरातून गायब होत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी वेंगुर्ला येथून त्याला ताब्यात घेत सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चौकशी नंतर त्याला सोडून देत पोलिसांची त्याच्यावर करडी नजर होती. परंतु चार दिवसांपूर्वी पोलिसांना गुंगारा देत हा युवक गायब झाला होता, पोलीस त्याच्या मागावर होते. काल तो युवक ठाणे, मुंबई येथे असल्याचे समजताच त्याला ठाण्यात ताब्यात घेण्यात आले. आज सकाळी त्या युवकाला घेऊन पोलीस सावंतवाडीत आले. संध्याकाळी उशिरा संपूर्ण चौकशी अंती श्रीमती निलिमा खानविलकर व शालिनी सावंत या दोन्ही वृद्ध महिलांचा खून त्यांच्याच घराशेजारी राहणारा कुशल उर्फ विनायक नागेश टंगसाळी (३२, रा.उभाबाजार,सावंतवाडी) यानेच केल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जाहीर केले. सावंतवाडीत खून झाल्यानंतर दोन वेळा नाट्यमयरीत्या गायब झाल्याने खुनाचा मुख्य संशय विनायक टंगसाळी यांच्यावरच होता.


खून प्रकरणात आपल्यावर संशय आहे व आपण पकडले जाऊ या भीतीपोटीच त्याने स्वतःला संपविण्याचा व पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. खुनाची कबुली दिलेला कुशल उर्फ विनायक ग कर्जबाजारी होता, त्यामुळे दागिन्यांच्या हव्यासापोटी त्याने दोन्ही वृद्ध महिलांचा खून केला. निलिमा यांच्या गळ्यातील सोन्याची चैन गायब होती, परंतु शालिनी यांच्या गळ्यात असलेली चैन खोटी असल्यानेच पळविली नाही, आणि सोन्याच्या जाणकार व्यक्तिशिवाय दुसरा कोणी खरी खोटी चैन ओळखू शकत नव्हता. पोलिसांनी तपासकामी आणलेला श्वान उभाबाजार पांजरवाडा, आत्मेश्वर मंदिर, माठेवाडा असा फिरत पुन्हा खून झाला त्याच ठिकाणी आला होता, त्यामुळे खुनी हा पुन्हा त्याच घराकडे आला आणि संशयित शेजारील असल्याने तोच तिथे पुन्हा येऊ शकतो हे अधोरेखित झाले होते. खुनी बाहेरचा असेल अथवा संशयित असेल तर तो पुन्हा फिरून न येता पळून गेला असता.
खून प्रकरणी माहिती देताना एसपी राजेंद्र दाभाडे यांच्या सोबत जिल्हा पोलिस उपअधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पो. निरीक्षक सुनील धनावडे, सावंतवाडी पीआय शंकर कोरे आणि सहा.पो.नी.तौफिक सय्यद उपस्थित होते. जिल्हा पोलीस प्रमुखांनी सहा.पो.नि. तौफिक सय्यद यांचे विशेष अभिनंदन केले. राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी तपास केला. या खून प्रकरणी खून झालेल्या दोन्ही कुटुंबियांची चौकशी करण्यात आली होती, तसेच त्या घरासमोरील मारुतीच्या घुमटीला नारळ वाहून दिवाबत्ती करत पाया पडण्यासाठी परप्रांतीय एका समाजाचे लोक येतात त्यांच्याकडेही त्यादिवशी कोणी संशयित आढळला का? ताबाबत चौकशी करण्यात आली होती. खून झालेल्या घरात आणि आजूबाजूला त्यादिवशी वावरत असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात आली होती. एका सामाजिक कार्यकर्त्याने खून झाला त्यादिवशी दिलेली माहिती देखील विसंगत असल्याने पोलिसांचा तपास भरकटतो की काय अशी समज सावंतवाडी वासीयांची होत होती.
पोलिसांनी दोन्ही वृद्ध महिलांना कोण डबा देतो, किती वाजता देतो याबाबत संपूर्ण चौकशी केली होती. काहीजण पोलिसांच्या रडारवर होते परंतु तपासकामी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. परंतु प्रथम संशयित म्हणून चौकशी केलेल्या कुशल उर्फ विनायक नागेश टंगसाळी या तरुणाने वेंगुर्ला येथे जात विष पिऊन आत्महत्या करत असल्याचे सांगत स्वतःला संपविण्याचा केलेला प्रयत्न पत्नीची बेपत्ता असल्याची तक्रार व घडलेली नाट्यमय घटना, त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी पुन्हा घरातून गायब होणे. पारपोली-दाणोली येथे लोकेशन भेटणे, परंतु तिथे तो सापडून आला नाही आणि अचानक मुंबई ठाणे येथे त्याचे लोकेशन आढळून येतात पोलिसांनी ठाणे येथे जात त्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती कुशल उर्फ विनायक टंगसाळी याने खुनाची कबुली दिली. सकाळपासून पोलीस या तरुणाची चौकशी करत होते, परंतु त्याबाबत कोणतीही माहिती बाहेर पडू दिली नव्हती. अखेर संध्याकाळी जिल्हा पोलिस प्रमुखांनी खुनाबाबत रहस्यभेद करत माहिती जाहीर केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 2 =