ग्रामीण विकासासाठी किफायतशीर शेळीपालनावर उद्या कुडाळमध्ये मार्गदर्शन शिबिर
पशुसंवर्धन दिनानिमित्त जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभागाचा संयुक्त उपक्रम
कुडाळ,
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि कुडाळ तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पशुसंवर्धन दिना’चे औचित्य साधून उद्या एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली अर्थात किफायतशीर शेळीपालन’ या विषयावर आधारित हे शिबिर कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक भूषवणार आहेत. तर उद्घाटन उपसभापती सीताराम तेली यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला सिंधुदुर्गचे जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) डॉ. समीर बिलोलीकर, गटविकास अधिकारी मनोज भोगटे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ओरोसकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.
पशुपालकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन
या शिबिरात पशुपालकांना शेळीपालन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि पशू आरोग्य व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी सहाय्यक आयुक्त डॉ. रवींद्र दळवी, तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ. अभिजित कसालकर, कुडाळ पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. प्रज्ञा ओजस ओहोळ, माणगावच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निकिता तांबे तसेच बिबवणेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल वरठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा
ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी व पशुपालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. प्रज्ञा ओहोळ आणि डॉ. अभिजित कसालकर यांनी केले आहे.
