You are currently viewing आठवणींची दिवाळी

आठवणींची दिवाळी

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे यांची दिवाळीच्या आठवणी विशद करणारी अप्रतिम काव्यरचना..

सण दिवाळीचा आला
आठवणींचा पसारा
डोळ्यापुढे येतो आज
आई बाबांचा चेहरा ||

साठ सालची दिवाळी
थंडी भरली पहाट
थोडावेळ झोपण्याची
प्रत्येकाची खटपट ||

आई पुन्हा जागविते
बाबा म्हणती भूपाळी
मनामध्ये रुंजतात
आज पुन्हा त्याच ओळी ||

सारवलेले अंगण
फार रेखीव रांगोळी
तुळशीच्या ओट्यावरी
मांडलेल्या दीप ओळी ||

पहाटेच्या आंघोळीस
फटाक्यांची जोड मिळे
नव्या कोऱ्या कपड्यांनी
मनी आनंद उसळे ||

आई फार सुगरण
फराळाची रेलचेल
चव त्याची आठवता
मनी होई घालमेल ||

आई-बाबांच्या मायेने
बाल्य हसत सरले
सासरला जाता जाता
डोळे पाण्याने भरले ||

नातवंडां संगे आज
दिवाळीची शोभा वाढे
तृप्त मनाने पूजन
दिवा लावी देवापुढे ||

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + eighteen =